Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Kolhapur › धरण सुरक्षिततेसह कर्मचारीही वार्‍यावर

धरण सुरक्षिततेसह कर्मचारीही वार्‍यावर

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 11 2018 10:03PMकोल्हापूर : सुनील सकटे 

जलसंपदा खात्यातील  धरणांच्या तांत्रिक कामांसाठीचा  व्दार दुरुस्ती यांत्रिकी विभाग बंद केल्याने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुगू रत्नागिरी आणि गोव्यातील धरणांच्या गेट दुरुस्तीसाठी पुण्यातल कारागीरांवर विसंबून राहवे लागणार आहे. या निर्णयानंतर तांत्रिक कर्मचार्‍यांना कुठेही नेमणूक न दिल्याने हे कर्मचार तीन महिने वेतनाशिवाय आहेत. यामुळे शासनाने धरणांच्या सुरक्षीततेसह कर्मचार्‍यांनाही वार्‍यावर सोडले आहे.  

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे अशी चार उपविभागीय कार्यालये अस्तित्वात होती. कोल्हापूर सांगली येथील उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारीत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील प्रकल्पांचे काम केले जात होते.  नव्या रचनेत  कार्यकारी अभिंयता मुख्य व्दार उभारणी पथक क्रमांक 3 पुणे हे एकच पथक कार्यालय कार्यरत ठेवण्यात आले. उपविभागीय कार्यालये बंद करुन या भागातील धरणांच्या दरवाज्यांच्या उभारणीसह देखभाल दुरुस्तीची जबाबादारी पुण्यातील पथकांवर ठेवण्यात आली आहे. तिल्‍लारीतील चार मोठे  प्रकल्प, राधानगरी, काळम्मावाडी, वारणा आणि गोव्यातील मोठे चार प्रकल्पांसह या भागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या धरणांच्या दरवाजाची देखभाल दुरुस्तीचा प्रश्‍न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.  

पुणे येथील पथकात दरवाजा उभारणी आणि दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामगांसाठी लागणारा जाणारा वेल्डर फिटर, साहाय्यक मॅकॅनिक आणि मदतनीस ही तांत्रिक कर्मचार्‍यांची पदे रद्द केली आहे. हा कर्मचारी वर्ग कसा उपलब्ध करणार याबाबत कोणतेच निर्देश दिसून येत नाहीत. असे सुमारे 40 कर्मचार्‍यांना तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यांची कुठे नेमणूकही नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांसह धरणांच्या सुरक्षीततेसह दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुगू रत्नागिरी आणि गोवा या पावसाच्या  पट्ट्यात धरणातील पाणीसाठ्यात सातत्यााने वाढ होत असते.  धरणांच्या तांत्रिक कामे निघत असतात.  

जिल्ह्यातील धरणांच्या गेटची दुरुस्ती, सुरक्षितता, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संंबंधीत जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाकडे यंत्रणा (मोबाईल युनिट) उपलब्ध होती.  नव्या रचनेत हे मोबाईल युनिट बंद केली  आहेत.  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनींनी वस्तुस्थिती विशद करुन जिल्हावार उपविभाग कार्यरत ठेवावी अथवा या भागासाठी इस्लामपूर येथे कार्यालयाचा प्रस्ताव सुचवला आहे. या दोन्हीपैकी एका प्रस्तावावर शासनाने गंभीरपणे विचार करावा अशी मागणी नागरीकांसह यांत्रिकी विभाग कर्मचारी संघटनेने केली आहे. वेतन मिळाले नसल्याने या कर्मचार्‍यांनी संघर्षाचे पाउल उचलले आहे. प्रसंगी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.