Tue, Apr 23, 2019 08:27होमपेज › Kolhapur › धरणांची गेट दुरुस्ती आता पुणेकरांवर विसंबून

धरणांची गेट दुरुस्ती आता पुणेकरांवर विसंबून

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:15PMकोल्हापूर : सुनील सकटे 

जलसंपदा विभागात धरणांच्या गेटस्सह तांत्रिक कामांसाठी आवश्यक असणारा द्वार दुरुस्ती यांत्रिकी विभाग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे    कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील धरणांच्या गेट दुरुस्तीसाठी पुण्यातून कारागिरांना बोलवावे लागणार आहे. या भागात एखादी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास कठीण परिस्थिती होणार आहे. 

नाशिक येथील यांत्रिकी मुख्य अभियंत्याच्या अखत्यारित असणार्‍या अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ कोल्हापूर अंतर्गत असणार्‍या कार्यकारी अभियंता मुख्य द्वार उभारणी पथक क्रमांक 3 पुणे या कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे अशी चार उपविभागीय कार्यालये अस्तित्वात होती. कोल्हापूर सांगली येथील उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील प्रकल्पांचे काम केले जात होते. आता नव्या रचनेत कार्यकारी अभियंता  मुख्य द्वार उभारणी पथक क्रमांक 3 पुणे हे एकच पथक कार्यालय अस्तित्वात आणले आहे. एवढेच नाही तर उपविभागीय कार्यालये बंद करून या भागातील धरणांच्या दरवाजांच्या उभारणीसह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पुण्यातील या पथकांवर सोपवण्यात आली आहे. 

तिलारीतील चार मोठे, प्रकल्प, राधानगरी, काळम्मावाडी, वारणा आणि गोव्यातील मोठे चार प्रकल्पांसह या भागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या धरणांच्या दरवाजाची देखभाल दुरुस्तीचा प्रश्‍न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.  कोल्हापूर आणि परिसरातील धरणांच्या कामांसाठी गोवा ते पुणे हे सहाशे कि.मी. आणि कोल्हापूर पुणे हे 250 कि.मी. अंतर पार करून अधिकार्‍यांना यावे लागणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा पेच कसा सुटणार हा मोठा प्रश्‍न आहे. 

पुणे येथील पथकात केवळ अभियंत्यांना समावेश असल्याचे दिसून येते. मात्र, दरवाजा उभारणी आणि दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामासाठी लागणारा वेल्डर फिटर, सहाय्यक मेकॅनिक आणि मदतनीस ही तांत्रिक कर्मचार्‍यांची पदे रद्द केली आहे. हा कर्मचारी वर्ग कसा उपलब्ध करणार याबाबत कोणतेच निर्देश दिसून येत नाहीत. 

कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा हा जास्त पावसाचा पट्टा आहे. या पट्ट्यात धरणातील पाणीसाठ्यात सातत्यााने वाढ होत असते. एवढेच नाही धरणांची तांत्रिक कामे निघत असतात. अशावेळी एवढ्या लांब अंतरावरून कर्मचारी येऊन दुरुस्ती कधी करणार ?  ज्या त्या जिल्ह्यातील धरणांच्या गेटची दुरुस्ती, सुरक्षितता, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संंबंधित जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाकडे यंत्रणा (मोबाईल युनिट) उपलब्ध होती. 

मात्र, नव्या रचनेत हे मोबाईल युनिट बंद केल्याने आता या कामांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिनींनी वस्तुस्थिती विशद करून जिल्हावार उपविभाग कार्यरत ठेवावी अथवा मुख्य अभियंत्यांनी या भागासाठी पेठनाका, इस्लामपूर येथे कार्यालयाचा प्रस्ताव सुचवला आहे. या दोन्हींपैकी एका प्रस्तावावर शासनाने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी नागरिकांसह यांत्रिकी विभाग कर्मचारी संघटनेने केली आहे.