Wed, Nov 21, 2018 11:53होमपेज › Kolhapur › प्रतिभानगरात वाहनांची तोडफोड

प्रतिभानगरात वाहनांची तोडफोड

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:49AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

वर्चस्ववादातून तरुणांच्या टोळीने प्रतिभानगर, दौलतनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री दहशत माजवली. या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीत टेम्पो, चारचाकी, रिक्षांसह दुचाकींचेही नुकसान झाले आहे. दीड महिन्यात दुसर्‍यांदा असा प्रकार घडला आहे. 

प्रतिभानगरातील दोन गटांत दीड महिन्यांपूर्वी वर्चस्ववादातून वाद झाला होता. यावेळी 10 ते 12 चारचाकींची तोडफोड करण्यात आली होती. मंगळवारी रात्रीही अज्ञातांनी दहशत माजवत अनेक वाहनांवर दगडफेक केली. यात महेश सूर्यकांत केसरकर यांचा टेम्पो, सचिन कामरा यांच्या आईस्क्रीम विक्रीच्या दोन रिक्षांच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. जगदाळे कॉलनीतील राजरतन कांबळे यांच्या चारचाकीची समोरील काच फोडण्यात आली. 
दौलतनगरातील दत्तप्रसाद आमते व मनोज शिंदे यांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली. दौलतनगरातही मध्यरात्री अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. 

प्रतिभानगरात मध्यरात्री काही तरुणांकडून दगडफेकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत रहिवाशांनी राजारामपुरी पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच दौलतनगरात यापूर्वीही रात्रीच्यावेळी पेट्रोलबॉम्ब फेकणे, वाहनांची जाळपोळ करण्याचे प्रकार वैयक्‍तिक वादातून घडले आहेत. अशांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम राजारामपुरी पोलिसांत सुरू होते.