Sun, Feb 17, 2019 13:28होमपेज › Kolhapur › जयसिंगपूरजवळ कुंटणखान्यावर छापा

जयसिंगपूरजवळ कुंटणखान्यावर छापा

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:44AM

बुकमार्क करा
जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपूर- कोल्हापूर महामार्गावर इचलकरंजी फाट्यावर निमशिरगाव हद्दीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून   कुंटणखाना मालक व पाच महिलांना ताब्यात घेतले. इचलकरंजी, तारदाळ, कोरोची परिसरातील या पीडित महिला आहेत. बाळासाहेब आण्णाप्पा पाटील (वय 60, रा. निमशिरगाव) असे मालकाचे नाव आहे. खबर्‍याकडून  मिळालेल्या  माहितीनंतर बोगस ग्राहक पाठवून पोलिसांनी शहानिशा करून बुधवारी सायंकाळी कारवाई केली.

कारवाईत रोख रक्‍कम, मोबाईल हँडसेट असा एकूण दोन हजार 642 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाटील हा पीडित महिलांना वेश्यागमनासाठी पुरवून व वेश्याव्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्‍नावर आपली उपजीविका करीत होता. पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पाटील याची सांगली-कोल्हापूर महामार्गालगत शेतजमीन आहे. या शेतातील कौलारू  घराचा कुंटणखाना म्हणून त्याने वापर सुरू केला होता.  कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षच्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव व पथकाने कारवाई केली. 

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वेश्या व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या आदेशाने व अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते व सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल  आनंदराव गोडसे, रवींद्र गायकवाड, पोलिस नाईक आनंदा पाटील, महिला पोलिस नाईक जयश्री पाटील, शीतल लाड, माधवी घोडके, वैशाली पिसे तसेच चालक पोलिस हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी कारवाई केली.