Tue, Feb 19, 2019 08:15होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत कायदा-सुव्यवस्थेचा ‘मर्डर‘

इचलकरंजीत कायदा-सुव्यवस्थेचा ‘मर्डर‘

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 12:11AM कोल्हापूर : दिलीप भिसे

13 खून, 33 खुनाचे प्रयत्न, 10 संघटित टोळ्यांतील 49 गुन्हेगारांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई अन् 48 सराईत तडीपार... भरचौकात, भरदिवसा घडणारा थरार... जीवघेणा पाठलाग आणि टोळ्यातील सूडचक्र... दोन वर्षे इचलकरंजीकर उघड्या डोळ्यांनी गुन्हेगारीचा थरार अनुभवताहेत... मँचेस्टर समजल्या जाणार्‍या वस्त्रोद्योग नगरीसह परिसरात संघटित टोळ्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अलीकडच्या काळात गुन्हेगारांच्या गंभीर कारनाम्यांचा वाढता आलेख पाहिल्यास शांतता-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र दिसून येते. 

गुन्हेगारी टोळीत का सक्रिय होत नाहीस? या कारणातून इचलकरंजी येथील जयभीमनगर झोपडपट्टीत सोमवारी थरार घडला. आदर्श टोळीतील साथीदारांनी पूर्वाश्रमीचा रेकॉर्डवरील संशयित रामा गरडचा पाठलाग करीत भरचौकात त्याचा जीव घेतला. यापूर्वीही अजित ऊर्फ चिमण येडकेला याच पद्धतीने भरदिवसा संपविण्यात आले. 

खुनी हल्ल्यासह खंडणी वसुली, अपहरण, गर्दी-मारामारी, महिलावरील अत्याचार, छेडछाड, खासगी सावकारीसह काळ्याधंद्याच्या फोफावलेल्या अफाट साम्राज्यामुळे इचलकरंजीसह शहापूर, कबनूर, खोतवाडी, यड्राव परिसरातील कायदा-सुव्यवस्था पार ढासळल्याचे चित्र आहे. शहरासह ग्रामीण भागातील गुन्हेगारीच्या वाढत्या साम्राज्यामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढू लागली आहे. अनेक गोरगरीब कुटुंबातील तरणी पोरं क्षणिक मोहाला बळी पडून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू लागली आहेत. गुन्हेगारीच्या जाळ्यात अलगद सापडू लागली आहेत.

घातक शस्त्रांसह अमली पदार्थाची तस्करी, अनैतिक मानवी व्यापार, लूटमारीसह चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातही कमालीची वाढ झालेली असतानाही इचलकरंजीतील शिवाजीनगर, गावभाग, शहापूर पोलिस यंत्रणेला वाढत्या घटनांचे गांभीर्य दिसून येत नाही. शहर, परिसराचा झपाट्याने विस्तार होताना रोजी-रोटीसाठी वास्तव्याला आलेल्यांची संख्याही भरमसाट आहे. त्याचा फायदा सराईत म्होरक्यासह  साथीदार उठवित आहेत. 

चिरीमिरीला भुलून अनेक उच्चशिक्षित तरुणही टोळ्यामध्ये सक्रिय होऊ लागले आहेत. हे चित्र समाजाला घातक ठरणारे असूनही त्यावर जालीम मात्रा लागू करण्यास पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत आहे.