Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Kolhapur › दौलतनगरात तलवार हल्ला, दगडफेक

दौलतनगरात तलवार हल्ला, दगडफेक

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 12:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दौलतनगरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या तलवार हल्ल्यात आकाश आनंदा मळगेकर (वय 23, दौलतनगर) जखमी झाला. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. रात्री आठच्या सुमारास एका गटाने तलवारी व हॉकी स्टिक घेऊन तीनबत्ती चौकात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन घरांत घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दौलतनगर तीनबत्ती चौकातील दोन गटांत गेले काही दिवस वाद सुरू आहे. शुक्रवारीही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला होता. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आकाश मळगेकर तीनबत्ती चौकात थांबलेला असताना दिनेश कलकुटकी, विनायक कलकुटकी आणि त्यांच्या साथीदारांनी आकाशवर हल्ला केला. झटापटीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आकाशचा
 पाठलाग करून त्याला मारहाण करण्यात आली.

तलवारीचा वार पाठीवर लागल्याने आकाश जखमी झाला. तर छोट्या, संदीप, आशीर, स्वप्निल यांनी हॉकी स्टिकने आकाशला मारहाण केली. भरचौकात सुरू असलेल्या प्रकाराने नागरिकांची धावपळ उडाली. आकाशची सोडवणूक करण्यास आलेल्या त्याच्या कुटुंबीयांनाही धक्काबुक्की करण्यात आली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शहाजी निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला. तसेच संशयितांची धरपकड सुरू केली. 

दरम्यान, रात्री आठच्या सुमारास तरुणांच्या एका गटाने कमळाबाई वडर, दिनेश कलकुटकी यांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. राजारामपुरी पोलिस ठाण्याचा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.