Tue, Jul 16, 2019 10:20होमपेज › Kolhapur › गुन्हेगारीचा ‘महामार्ग’!

गुन्हेगारीचा ‘महामार्ग’!

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 1:05AMकोल्हापूर : दिलीप भिसे

मराठवाडा, विदर्भासह पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सातारा जिल्ह्यांत दोन डझनांवर गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या आणि बीड जिल्ह्यात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह पसार झालेल्या कुख्यात टोळीचा म्होरक्या विलास महादेव बडेला स्थानिक गुन्हे अन्वेषणने नुकतेच जेरबंद केले. खुनाच्या प्रयत्नासह जबरी चोरी, लूटमार आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या सराईताला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. बीड पोलिसांनी बक्षीसही लावले होते. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी म्होरक्याला सांगली फाट्यावर नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या.

फरारी दरोडेखोर तीन वर्षे उचगावला वास्तव्याला 

चौकशीत आणखी काही धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. एका अधिकार्‍यासह पाच पोलिसांना घरी पाठविणारा दरोडेखोर तीन वर्षांपासून उचगाव (ता. करवीर) येथील मणेरमळ्यात वास्तव्याला होता. भाड्याने खोली घेऊन रखेलीसमवेत राहत होता. या काळात मराठवाडा, विदर्भातील सराईतांशी त्याचे कनेक्शन असायचे.

स्थानिक गुन्हेगारांशी कनेक्शन आणि रिमोट!

उचगावमधून जेरबंद म्होरक्या टोळीच्या कारनाम्याची सूत्रे नियंत्रित करीत होता. चैनविलासी जीवन जगणारा सराईत रंगेलपणासह ऐशआरामी राहणीमानावर बेमालूम उधळपट्टी करायचा... याचाच अर्थ सराईत म्होरक्याचे स्थानिक टोळ्यांशी कनेक्शन असावे अथवा आंतरराज्य टोळ्यांद्वारे महामार्गावर घडणार्‍या कृत्यांचे त्याच्याकडे रिमोट  असावे?

पोटासाठी आले... अन् महामार्गावर दुकान थाटले

परवा आणखी एका सराईत टोळीचा छडा लागला. संशयित महेश गायकवाडला जेरबंद केल्यानंतर टोळीकडून 16 गुन्हे उघड झाले. महेशसह साथीदार मूळचे उस्मानाबादचे आहेत. पोटाच्या खळगी भरण्यासाठी आले आणि महामार्गावर लुटमारीची दुकानदारीच सुरू केली आहे. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून कामगार, वाहनधारकांसह व्यापार्‍यांना लुटण्याचा बेधडक धंदा सुरू झाला आहे.

महामार्गालगत भाड्याच्या खोल्यांत सराईतांचे वास्तव्य

शिरोली एमआयडीसी, सांगली फाटा, गोकुळ शिरगावसह लक्ष्मी टेकडी परिसरासह कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील मजलेखिंड परिसर म्हणजे सराईत टोळीच्या लुटमारीचा अड्डाच बनला आहे. रात्री-अपरात्री महामार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरू लागले आहे. लुटमारी अथवा गंभीर घटनेनंतर पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सराईत महामार्गालगत खोल्या भाड्याने घेऊन वास्तव्य करू लागले आहेत. हे प्रकार पोलिस चौकशीतून उघड होऊ लागले आहेत.