Tue, Jul 16, 2019 09:58होमपेज › Kolhapur › सीपीआरचे कर्मचारीच ‘अपंग’

सीपीआरचे कर्मचारीच ‘अपंग’

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:35PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

सीपीआर रुग्णालयात अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे.  विशेष म्हणजे रुग्णालयातील अनेक कर्मचार्‍यांनी  अपंग असल्याची बनावट प्रमाणपत्रे मिळवून विविध योजनांचा लाभ मिळवत शासनाची फसवणूक केली आहे. अशी प्रमाणपत्रे देण्यात आजी -माजी वरिष्ठ अधिकार्‍यांचा हात आहे. याची सखोल चौकशी केली तर अनेकांचे पितळ उघडे पडणार आहे. 
सीपीआरमधील अनेक कर्मचार्‍यांनी शासनाच्या विविध योजना आणि अनुदान लाटण्यासाठी सुद‍ृढ असूनही चक्‍क ‘अपंग’ असल्याची बनवेगिरी करून प्रशासनाकडून प्रमाणपत्रे मिळविली आहेत.  अशा प्रकारची प्रमाणपत्रे देण्यात येथील काही डॉक्टरांचा ‘इंटरेस्ट’ आहे.  येथील कर्मचार्‍यांनी ‘अपंग’त्वाची बोगस प्रमाणपत्रे मिळवून रुग्णालयास काळिमा फासला आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी प्रसूती विभागात रुग्णांच्या नातेवाइकांकडून पैसे घेतल्याचा ठपका ठेवून चार महिला कर्मचारी व मुकादमावर कारवाई झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच सुद‍ृढ कर्मचार्‍यांनी ‘अपंग’ असल्याची प्रमाणपत्रे मिळविल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे.

‘खुशी’ दिल्याशिवाय काम नाही
तीन वर्षांपूर्वी बोगस प्रमाणपत्रावरून सीपीआरची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. आता रुग्णालयातील सुद‍ृढ कर्मचार्‍यांनी ‘अपंग’त्वाची बोगस प्रमाणपत्रे मिळविली आहेत. या सुद‍ृढ पण कागदोपत्री अपंग असणार्‍या कर्मचार्‍यांनी मिळविलेल्या लाभाची चर्चा सीपीआर परिसरात होत आहे. खरोखरच अपंग असणार्‍या बांधवांना प्रमाणपत्रे मिळविताना सीपीआरमध्ये तारेवरची कसरत करावी लागते. प्रमाणपत्र आणि वैद्यकीय अहवालासाठी येथील कर्मचार्‍यांना ‘खुशी’ दिल्याशिवाय काम होत नसल्याची तक्रार अनेक अपंग बांधवांची आहे. तसे काही प्रकारही यापूर्वी समोर आले आहेत. 

अपंगांचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट सीपीआर परिसरात आहे.  येणार्‍या अपंग बांधवांशी संपर्क साधून एजंट त्यांचे काम करतात आणि खुशी म्हणून पैसे उकळतात. या पैशात खालपासून वरपर्यंत सगळ्यांचा वाटा असल्याची चर्चा आहे.  विशेष म्हणजे बोगस प्रमाणपत्र मिळवून देण्यापर्यंत येथील एजंट आणि कर्मचार्‍यांची मजल गेली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे अपंगाच्या मलिद्यावर सीपीआरमधील कर्मचार्‍यांनी बोगस प्रमाणपत्रे मिळवून डल्ला मारला आहे. बोगस प्रमाणपत्रांचा शोध घेण्यास सीपीआर प्रशासनाला मात्र वेळ नाही का? असा प्रश्‍न रुग्ण व नातेवाइकांतून उपस्थित होत आहे.  

खर्‍या अपंगांचे हाल
सीपीआरमध्ये जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून उपचारासाठी रुग्ण येतात. यामध्ये अनेक अपंग बांधवही असतात. अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची संगणकीय नोंदणी व अन्य वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. त्याचबरोबर ‘खुशी’ही द्यावी लागते, तेव्हाच त्यांना हे प्रमाणपत्र उपलब्ध हेाते.

संगणकीय नोंदणीसाठी टाळाटाळ 
9 मे 2013 मध्ये आरोग्य सेवा संचालनालयाने अपंग प्रमाणपत्रांची तपासणी करून नवीन प्रणालीनुसार नूतनीकरण करण्याचा अध्यादेश काढला आहे. एसएडीएम प्रणालीमार्फही प्रक्रीया सुरू आहे. अनेक अपंगानी संगणकीय नोंदणी करून घेतली आहे. पण, ‘शंकास्पद ’अपंग बांधवांनी या नोंदणीकडेच पाठ फिरवली आहे. यामध्ये सीपीआरमधील आरोग्याने सुदृढ पण कागदोपत्री अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळविलेल्यांचाही समावेश आहे.  

सीपीआर रुग्णालयातून दिल्या गेलेल्या सर्वच प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करू. बोगस  प्रमाणपत्र आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. बोगस प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफाश करू. ऑनलाईन नोंदणीसाठी अनेकजण दिरंगाई करत आहेत.यावरून साशंकता दिसून येते आहे. 
- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर