Tue, Jul 16, 2019 09:38होमपेज › Kolhapur › सीपीआरमधील बोगस प्रमाणपत्रे शोधा

सीपीआरमधील बोगस प्रमाणपत्रे शोधा

Published On: Feb 09 2018 2:19AM | Last Updated: Feb 05 2018 11:41PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

 छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अपंगांची बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी असून, यामध्ये रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांचा हात आहे. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी देखील बोगस प्रमाणपत्रे घेऊन, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविला आहे. त्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पतित पावन  संघटनेने निवेदनाद्वारे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांना दिला. 

9 मे 2013 पासून आरोग्य सेवा संचलनालयाने अपंग प्रमाणपत्रांची तपासणी करून नवीन प्रणालीनुसार नूतनीकरण करण्याचा अध्यादेश काढला आहे. बोगस प्रमाणपत्राद्वारे शासनाचा लाभ मिळविलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. बोगस प्रमाणपत्रे देणार्‍या डॉक्टरांचा शोध घेऊन टोळीचा पर्दाफाश करावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संघटनेने दिला आहे. 

शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, संकेत नाळे, विशाल पाटील, विकास कांबळे, इंद्रजित बोरचाटे, निवास पाटील, म.न.से. उपजिल्हाध्यक्ष अमित पाटील, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनचे अवधूत भाटे यांचा समावेश होता.