Mon, Jul 22, 2019 05:01होमपेज › Kolhapur › गायीच्या एका वेतात तब्बल 23,778 रुपये तोटा!

गायीच्या एका वेतात तब्बल 23,778 रुपये तोटा!

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:23PMकुडित्रे : प्रतिनिधी

सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी  8 टक्के म्हशीचे व 20 टक्के गायीचे दूध असा ‘गोकुळ’चा संकलन पॅटर्न होता. संघानेच प्रोत्साहन दिल्याने गायींचे प्रमाण वाढत गेले. आता गाय-म्हशीच्या दुधाचे प्रमाण 50:50 टक्के झाले आहे. सरासरी दर प्रतिलिटर 23 रुपये 90 पैसे जरी धरला, तरी जास्तीत जास्त दूध देणार्‍या गायीच्या एका वेतात दूध उत्पादकाला व्यावसायिक द‍ृष्टिकोनातून तब्बल 23,778 रुपयांचा तोटा होतो. पदरात फक्‍त शेण आणि घरात चहाला दूध मिळते इतकंच.

ताळमेळ बसेना!

सखुबाई शेलार (कुडित्रे) यांनी गायीच्या एका वेताचा जमा-खर्च लिहून ठेवला आहे. त्यांच्याकडे मुक्‍त गोठा पद्धतीने पाळलेल्या चार गायी आहेत.

उत्पन्‍नाचा विचार : एका चांगल्या व जास्तीत जास्त दूध देणार्‍या गायीचे एका वेतातील दूध सुमारे 3,500 लिटर्स मिळते. सरासरी 4 फॅट लागते. सरासरी दर प्रतिलिटर 23 रुपये 90 पैसे गृहीत धरला, तर या दुधाचे 83,650 रुपये उत्पन्‍न होईल. यामध्ये एका चांगल्या दूध संस्थेच्या नफ्यातून मिळणारे 15 टक्के रिबेट विचारात घेतले, तर 81 ,900 रुपयांवर 12,285 रुपये रिबेट मिळेल. अधिक ‘गोकुळ’कडून मिळणारा दर फरक प्रतिलिटर 1 रुपये 05 पैशांप्रमाणे 3,675 रुपये मिळेल. म्हणजे एका वेतातील मिळणार्‍या दुधापासून दुधाचे अधिक रिबेट अधिक संघ दर फरक मिळून 99,610 रुपये उत्पन्‍न मिळेल.

उत्पादन खर्चाचा विचार : पशुखाद्य : एका गायीच्या शरीर पोषणास रोज 1 किलोप्रमाणे 365 किलो पशुखाद्य लागते. शिवाय, एक लिटर दुधासाठी प्रतिलिटर 400 ग्रॅम याप्रमाणे 3,500 लिटर्ससाठी 1,400 किलो पशुखाद्य लागते. म्हणजे एकूण 1,765 किलो पशुखाद्याचे प्रतिकिलो 19 रुपये 20 पैशांप्रमाणे 33,888 रुपये खर्च होणार. 

वैरण : एका गायीस एका वेतात 9 टन वैरण लागते. प्रतिटन 5 हजार रुपयांप्रमाणे वैरणीचे 45 हजार रुपये होतात.

गुंतवणूक-व्याज : एका गायीची किंमत 60 हजार धरली तर त्यावर 10 टक्के दराने 6 हजार रुपये व्याजाचे होतात.

औषधोपचार : एका वेतात सुमारे 2 हजार रुपये रेतन व औषधोपचारावर खर्च होतात. 

मजुरी : साधारणतः, दररोज 1 मजूर गृहीत धरला. मजुरी दैनिक 100 रुपयांप्रमाणे 365 दिवसांची 36,500 रुपये मजुरी होते. म्हणजे पशुखाद्य, वैरण, व्याज, औषधोपचार व मजुरी यावर एका वेतात 1,23,388 रुपये उत्पादन खर्च होतो.