होमपेज › Kolhapur › पर्यटनस्थळांवर युगुलांचा वावर

पर्यटनस्थळांवर युगुलांचा वावर

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:23PMचंदगड : नारायण गडकरी  

चंदगड तालुक्यातील निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेल्या पर्यटनस्थळांवर अलीकडे ‘प्रेमातूर जोडप्यां’चा उघड धुमाकूळ सुरू झाल्यामुळे पर्यटनस्थळी जुनी-जाणती संस्कृती पुरती घुसमटून गेली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात तरुणाई जेवढी बहकलीय, त्याही पेक्षा कैकपटीने येथील स्थानिक रहिवासी हबकले आहेत.  

कॉलेजमधील गुणी आणि अभ्यासू मुले-मुली या प्रकाराला अपवाद असतील. परंतु, काही युवक-युवती पर्यटनस्थळांवर एकांत शोधताना दिसतात. गोवा, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातून ऐतिहासिक घटनांची पार्श्‍वभूमी लाभलेल्या या पर्यटनस्थळांना पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. परंतु, अलीकडे या ठिकाणी काही चित्र-विचित्र प्रकार घडण्याचे प्रमाण वाढले आहेत. 
तिलारी धरणाच्या निर्मल जल प्रवाहात दारूच्या बाटल्या रिकाम्या करणार्‍या टोळक्यांच्या कृत्यांकडे पोलिसांचीही नजर असणे गरजेचे आहे. तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या वैजनाथ डोंगरावर या प्रेमीयुगुलांचा सर्रास वावर असतो. येथे येणार्‍या भाविकांनाही त्यांच्याकडे कानाडोळा करावा लागतो. प्रतिमहाबळेश्‍वर समजल्या जाणार्‍या पारगड, स्वप्नवेल आणि रातोबा पॉईंट ही स्थळेही प्रेमीयुगलांनी काबीज केली आहेत. हेच प्रकार स्वप्नवेल पॉईंट तिलारी पर्यटनस्थळावर घडत आहेत. यामध्ये कॉलेज तरुण-तरुणींचा मोठा सहभाग आहे. कॉलेज भरल्याची घंटा होत असताना त्याचवेळेला विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलवरून आपली ओळख लपवण्यासाठी ओढणी तोंडाला बांधून स्वप्नवेलच्या दिशेने सुसाट जाणार्‍या तरुणींच्या पालकांना आपली मुलगी कुठल्या क्लासमध्ये शिकत आहे हे कसे कळणार? बारकाईने अभ्यास केला तर पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवण्याऐवजी घरी बसवणे पसंद करतील, अशी परिस्थिती आहे. महाविद्यालयाच्या परिसरात फिरणार्‍या टोळक्यांवर लक्ष ठेवून महाविद्यालयाच्या प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.