Fri, Apr 26, 2019 09:34होमपेज › Kolhapur › स्वत:मधील क्षमतांची जाणीव झाल्यास यश निश्‍चित 

स्वत:मधील क्षमतांची जाणीव झाल्यास यश निश्‍चित 

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:59PMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्पर्धेच्या युगात स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्‍तिमत्त्व विकासाची आवश्यकता आहे. यश आपल्या संपर्कातील लोकांच्या आनंदावर अवलंबून असते. धैर्य, स्वत:वरील श्रद्धा, आत्मविश्‍वास, ध्येय तसेच आपण जे काम करतो त्यामध्ये एकाग्रता हवी. यासाठी शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवणे आवश्यक आहे.  स्वत:मधील क्षमतांची जाणीव असल्यास नियोजित उद्दिष्टपूर्तीसाठी उत्तम आयुष्य जगता येते, असे प्रतिपादन दिशा पाटील यांनी केले.

दै. ‘पुढारी’ संचलित प्रयोग फौंडेशनतर्फे आयोजित छत्रपती शाहू महाविद्यालय येथे सोमवारी (दि. 5) मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी अ‍ॅड. मेघा ठोंबरे, छत्रपती शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर.पी. देठे, श्रीमती एस. पी. मुल्‍लाणी, सिंधू आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिशा पाटील आणि अ‍ॅड. मेघा ठोंबरे या दै . ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या सल्‍लागार समिती सदस्या आहेत. 

पाटील म्हणाल्या, सृष्टीच्या इतिहासात तुमच्यासारखे कोणी नाही आणि यापुढेही होणार नाही, तुम्हीच आद्य, दुर्मीळ, अद्वितीय, एकमात्र असल्याचा आनंद साजरा करा. स्वत:ला समजून घेत वाईट गोष्टींवर मात करत चांगल्या गोष्टींचे जतन करा. व्यक्‍तिमत्त्व म्हणजे अस्तित्व असलेली व्यक्‍ती. व्यक्‍तीवर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडल्यास व्यक्‍तिमत्त्वात रूपांतर होते. टी.व्ही., मोबाईल, कॉम्प्युटरपासून मुलांनी दूर राहून वेगळ्या कला आत्मसात करत स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडावा, यासाठी जीवनात उद्दिष्ट्य ठरवल्यास त्याच्या पूर्ततेसाठी झटत राहा. 

 द्वितीय सत्रात अ‍ॅड. मेघा ठोंबरे यांनी भारतीय राज्यघटना, कौटुंबिक हिंसा, महिलाविषयक कायदे तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील समिती, अंतर्गत तक्रार निवारण समिती आदींबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच विविध कमिटीवर कार्यरत असताना आलेल्या घटनांचे दाखले देत तरुणींना समाजाचे वास्तव समजावून सांगितले. समारोपप्रसंगी दोन्ही वक्त्यांनी चर्चा करून महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्‍नमंजुषाही घेण्यात आली. प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनीस दै. ‘पुढारी’च्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.  या कार्यक्रमाला विद्यार्थिनींची मोठी संख्या होती. श्रीमती एस.पी. मुल्‍लाणी यांनी कार्यक्रमप्रसंगी दै. ‘पुढारी’चे ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे राबवल्याबद्दल अभिनंदन केले.