Mon, Aug 19, 2019 07:32होमपेज › Kolhapur › सापडला की चोर...बाकी सर्व शिरजोर!  

सापडला की चोर...बाकी सर्व शिरजोर!  

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 12:46AMकोल्हापूरः राजेंद्रकुमार चौगले

घटना क्र. 1 दि. 27 ऑगस्ट 2018,  नळपाणीपुरवठा योजनेचे मूल्यांकन करून मोजमाप पुस्तिका तयार करून देण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरोळ पंचायत समितीचा शाखा अभियंता  तुकाराम मंगलला अटक व तत्कालिन उपअभियंत्याला अशोक कांबळे याला ताब्यात घेतले. 

 घटना क्र.2 : दि. 30 ऑगस्ट 2018 : आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून नेमणुकीस असणारे कांबळे यांचा दोन महिन्यांचा थकीत पगार काढण्यासाठी बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांची लाच मागणारा अमर सुतार नामक एक लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला.

दोन्ही घटनांचा तसा एकमेकांशी संबंध नाही. पण जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये लाचखोरांचा सुळसुळाट आठवडाभरातील दोन्ही घटनांनी चव्हाट्यावर आला. दहा रुपयांपासून ते थेट लाखांच्या घरात लाच देणे-घेणे, गैरव्यवहार यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराची पाळेमुळे कशी घट्ट रुजली आहेत? याची जाणीव करून देतात. अशा प्रकरणांचा पोलखोल झाल्यानंतर सापडला म्हणून चोर ठरतो. परंतु, अप्रत्यक्ष या कनेक्शनचा एक महत्त्वाचा भाग असतात ते मात्र शिरजोर ठरतात.

दररोज विविध कारणांनी जिल्ह्यातील बहुतेक शासकीय कार्यालयात सर्वसामान्यांना वेठीस धरून पैसे उकळण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याचा जणू ढळढळीत पुरावाच यानिमित्ताने मिळाला आहे. पैशाचे वजन ठेवल्याशिवाय तेथील कागद एका टेबलावरून दुसर्‍या टेबलवर हलत नाहीत, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.

भ्रष्टाचाराची ही विषवल्ली केवळ शासकीय कार्यालयातच वाढते आहे, असे नाही. अशासकीय ठिकाणीही अशाप्रकारे पैसे मोजून काम करून घ्यावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. 
तालुका पंचायत, शिक्षणाधिकारी कार्यालय, समाज कल्याण खाते, कृषी खाते, नगर पंचायत,शासकीय इस्पितळ,  पोलीस, जि. पं. अभियांत्रीकी विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, महिला आणि बाल कल्याण खाते,  उत्पादन शुल्क, वनखाते आदी बहुतेक सर्वच खाती भ्रष्टाचाराच्या रडारवर आहेत. 

यासंदर्भात काही शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपापल्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला आहे.‘काय करणार पैसे वरपर्यंत पोहचवावे लागतात’, अशीच प्रतिक्रिया नामचिन अधिकारी आणि कर्मचार्‍याकडून मिळाली. अधिकार्‍यांच्या वरपर्यंतच्या यंत्रणेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता या कायदेशीर लुटमारीच्या धंद्यात  केवळ अधिकारी आणि शासकीय कर्मचारीच नाही तर काही लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांचे बुरखे पांघरुन दलाली करणारेही सामील असल्याचे दिसून आले आहे. 

एकूणच भ्रष्ट कारबाराबाबत एका अधिकार्‍याला ‘तुम्ही वरच्यांना पैसे का देता?’ असा प्रश्‍न उपस्थित केला असता, ‘योग्य ठिकाणी बदली आणि कामात थोडी ढिलाई हवी असेल तर वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांना खूश ठेवावेच लागते’, असा खुलासा पुढे आला.

 भ्रष्टाचाराची मुळं ही केवळ त्या-त्या कार्यालयातील कर्मचार्‍यांपर्यंत मर्यादित नाहीत तर ही मुळं खूपच खोलवर गेली आहेत, हेही या अणुशंगाने स्पष्ट झाले आहे. मात्र, यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे त्याचं काय? या प्रश्‍नाला मात्र कुणाकडेच उत्तर नाही.