Mon, May 20, 2019 18:03होमपेज › Kolhapur › शिक्षण क्षेत्राला लागली भ्रष्टाचाराची ‘कीड’

शिक्षण क्षेत्राला लागली भ्रष्टाचाराची ‘कीड’

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:38AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

नोकरी लागताना पैसे. नोकरी लावली म्हणून दर महिन्याला दहा टक्के कट. फरक काढण्यासाठीच्या अर्जावर स्वाक्षरीसाठी पैसे. प्रमोशनचा प्रस्ताव पाठवण्यासाठी दर ठरलेला. जिथं मिळवता येईल अशा ठिकाणी वाटमारी करण्याचा उद्योग शिक्षणक्षेत्रातही सुरू झाला आहे. हे प्रमाण वाढू लागल्याने चिंताजनक आहे. 

भ्रष्टाचार हा महसूल, पोलिस आणि सरकारी कार्यालयातच चालतो असं अनेकांची भाबडी समज असेल. कारण पवित्र मानल्या जाणार्‍या शिक्षण क्षेत्रातही ही कीड लागली आहे. भ्रष्ट प्राचार्यावर रयत शिक्षण संस्थेने  नुकत्याच केलेल्या बडतर्फ कारवाईमुळे या क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. शिक्षणसंस्थेत नोकरी मिळवायची असेल तर पात्र असूनही दहावीस लाख मोजावे लागतात, हा अनेकांचा अनुभव आहे. 

नोकरी लागल्यानंतर पुन्हा संस्थाचालकांसाठी खास टक्केवारीतला कट पगारातून बाजूला काढावा लागतो.  रितसर प्रमोशनासाठी वरिष्ठांची स्वाक्षरी लागते. ही स्वाक्षरी एक लाखापासून पाच लाखांपर्यंत असू शकते. म्हणजे एखाद्या दरपत्रकाप्रमाणे काही ठिकाणी उघड हे व्यवहार घडत आहेत. अगदी लहानसहान कामासाठी संबंधित संस्थेतील कारकूनालाही चिरमिरी देऊन खूश ठेवावे लागल्याचा पायंडा पडला आहे. सगळ्याच संस्थांमध्ये असे घडत नसले तरी बहुतेक ठिकाणी हा व्यवहार बनला आहे.

शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिक्षण विभागात लक्ष्मीदर्शनाशिवाय कामच केले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी या क्षेत्रातील सर्वांनीच संघटितपणे पुढे यायला हवे. लाच मागणार्‍यांची नावे संबंधितांनी जगजाहीर करायला हवीत. तरच या क्षेत्रातील भस्मासुरासारखी वाढत चाललेली कीड नष्ट होऊ शकते. दरम्यान, शिवाजी विद्यापीठात एका माजी कुलसचिवाच्या काळात भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाबाबत निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी पूर्ण झाली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाची चर्चा मात्र उघड सुरू असते. 

लाच ‘ऑन रेकॉर्ड’ !
एका प्राध्यापकाने प्रमोशनच्या प्रस्तावावर स्वाक्षरीसाठी संबंधित संस्थेच्या वरिष्ठाला मागणीप्रमाणे ऐंशी हजार रुपयांची लाच दिली. प्रस्ताव मंजूर झाला, कारण संबंधित प्राध्यापक पात्र होते. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तत्काळ त्या प्राध्यापकांनी संस्थेत मी पात्र असताना यांनी ऐंशी हजार घेतले, असे सांगायला सुरू केले. यासाठी त्यांनी बँकेतून काढलेल्या नोटांचा तपशीलाचे रेकॉर्डच दाखवण्यास सुरू केले.