आजर्‍यात कोरोना संशयित काही कुटुंबे क्वारंटाईन

Last Updated: Apr 07 2020 1:13AM
Responsive image


आजरा : पुढारी वृत्तसेवा   

आजरा येथील दर्गा गल्लीत  राहणार्‍या एका तरुणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाने संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दिल्ली येथील तबलिगला जाऊन आलेल्या या तरुणाकडून विसंगत माहिती मिळत असल्याने प्रशासनही चक्रावले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस व नगरपंचायतीने आरोग्य विभाग व तहसीलदारांच्या सूचनेवरून येथील दर्गा गल्ली परिसर सील केला आहे. संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांसह काही कुटुंबांना क्वारंटाईन करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.                   

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दर्गा गल्लीत राहणारा संशयित तरुण ग्रामीण रुग्णालयात पाच ते सहा दिवस उपचार घेत आहेे. आज त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने अधिक चौकशी केली असता त्याने दिल्ली येथील तबलिगला जाऊन आल्याचे सांगितले. यामुळे आरोग्य विभागही हादरून गेला. तातडीने त्याच्या पुढील तपासणीच्या हालचाली सुरू झाल्या.

तहसीलदार विकास अहिर, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, डी. डी. कोळी आदींनी तातडीने संयुक्त मोहीम राबवून येथील दर्गा गल्ली परिसर सील केला आहे. या गल्लीतील सुमारे 100 मीटर परिसरात नागरिकांना ये-जा करण्यास मज्जाव केला आहे.    रात्री उशिरा संशयिताच्या कुटुंबीयांसह संपर्कातील काही कुटुंबीयांना येथील शासकीय वसतिगृहात हलवण्याचे काम सुरू होते.                 

चंदगड येथील काहीजण त्याच्यासोबत होते, अशीही माहिती पुढे आल्याने त्यांचेही खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते. आजरा शहरात मात्र या प्रकरणाने भीतीचे वातावरण पसरले आहे.          

माहिती घेण्याचे काम सुरू                                                

संबंधित तरुण फेब—ुवारी महिन्यात दिल्ली येथे गेल्याचे सांगत  आहे. याचीही शहानिशा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. त्याच्यासोबत आजर्‍यातील आणखी कोणी गेले होते का? याचाही शोध सुरू आहे.