Mon, Apr 22, 2019 02:15होमपेज › Kolhapur › गाफील राहून माझा बळी देऊ नका : सतेज पाटील

गाफील राहून माझा बळी देऊ नका : सतेज पाटील

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत  आणि त्यांंंना निवडून आणण्याचा निर्धार करणारा ठराव मांडण्याबाबत कार्यकर्ते चर्चा करत असतानाच त्यांना थांबवत आमदार सतेज पाटील यांनी माझी आमदारकी 2022 पर्यंत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वजण गाफील राहिलो. त्याचा काय परिणाम झाला हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवित असताना सर्वांनी पूर्वीप्रमाणे एक दिलाने काम करणार असाल, माझ्या पाठीशी प्रामाणिकपणे राहणार असाल तर ठराव करा. अन्यथा पुन्हा माझा बळी देऊ नका, अशा शब्दात कार्यकर्त्यांसमोर भावना व्यक्‍त केल्या.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे पार पडला.  मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांना कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केला. मराठा समाजाबरोबरच धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजालाही आरक्षण देण्याच्या मागणीचा ठराव यावेळी करण्यात आला.

आमदार पाटील म्हणाले,  आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. 2014 च्या वातावरणात आता बदल होत आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले आहे. येणारी निवडणूक ही समान्य जनतेच्या प्रश्‍नासाठी लढायची आहे. गेल्या चार वर्षांतील भाजपच्या कार्यपद्धतीवर समाजातील सर्व घटक नाराज आहेेत. कर्जमाफी अजूनही कागदावरच आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे; पण त्याची दखल सरकार घेत नाही. पावसामुळे नुकसान झालेल्या उसाचे अद्याप सर्वेक्षण झाले नाही. 

दक्षिणच्या विद्यमान आमदारांनी जनतेची फसवणूक केली असल्यामुळे त्यांना तोंड दाखविण्यास आता जागा नाही, हे आगामी निवडणुकीतून कार्यकर्त्यांनी दाखवून दिले पाहिजे. विधान परिषदेवेळी अनेकांनी साथ दिली. जनतेचे आशीर्वाद मिळाले त्यामुळे मी निवडून आलो. ज्या नेत्याने जिल्ह्याला वेठीस धरले, लोकसभेत मला फसवलं त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. माझी विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत 2022 पर्यंत आहे. मात्र, दक्षिण मतदार संघातील सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता जनतेच्या पाठिंब्यावर आणि आग्रहास्तव आगामी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढणार आहे. त्यासाठी आपण सतर्क असला पाहिजे.  गाफील राहून विषाची परीक्षा पुन्हा घेऊ देऊ नका, असेही पाटील यांनी सांगितले.

जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी 1 सप्टेंबरपासून घरोघरी काँग्रेस ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोेहिमेत  लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असेही ते म्हणाले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, यावेळी संदीप मोहिते, तात्या शिंदे, राजू वळीवडेकर, राजू शिंदे, सचिन पाटील, संजय पाटील, श्रीपती कुंदिकर आदींची भाषणे झाली. त्यांनीही गेल्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुका टाळण्याचे आवाहन करत  गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी गट-तट विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले. 

मेळाव्यास सौ. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, करवीर पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, सदस्य मनीषा वास्कर, मारुती निगडे, विजय पाटील, बाबासो माळी, एकनाथ पाटील, भुजगोंडा पाटील, युवराज गवळी, प्रताप चांदवानी, विजय चौगुले यांच्यासह कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे  

दसरा चौकामध्ये सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.