Sun, Jul 21, 2019 17:01
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सतेज पाटलांचे मुन्‍ना महाडिकांना थेट आव्हान

सतेज पाटलांचे मुन्‍ना महाडिकांना थेट आव्हान

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 12:10AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या. याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतो, असे वक्‍तव्य करून काँग्रेसचे नेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय ऊर्फ मुन्‍ना महाडिक यांना थेट आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार आहे. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता, बंटी-मुन्‍ना मनोमिलन अशक्य असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे महाडिक यांना आघाडीतर्फे उमेदवारी मिळालीच तर पाटील हे विरोधात प्रचार करणार नाहीत; पण पूर्ण क्षमतेने त्यांच्या बाजूनेही उतरणार नाहीत, हे स्पष्ट आहे. परिणामी, महाडिक यांना ही निवडणूक ‘जड’ जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

पाटील व महाडिक हे एकेकाळचे ‘जिगरी दोस्त’ होते. मात्र, पाटील व खासदार महाडिक यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात बिनसल्यामुळे दोघे एकमेकांना पाण्यात पाहू लागले. सुरुवातीच्या काळात पाटील यांनी महादेवराव महाडिक यांनाच प्रमुख विरोधक मानून हल्ला चढविण्यास सुरुवात केली. परंतु, पाटील यांचे आरोप ‘जिव्हारी’ लागल्याने खासदार महाडिक यांनी आमदार पाटील यांच्या आरोपाला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केल्यापासून त्यांच्यात ‘वैर’ निर्माण झाले. एकमेकांशी बोलणे लांबच ते एकमेकांकडे पाहतही नव्हते. एकमेकांचे हाडवैरी बनलेल्या पाटील व महाडिक यांना 2014 मधील लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘एकत्र’ आणले. दोघांत ‘दिलजमाई’ झाली नसली तरी ‘समेट’ घडविला. त्यामुळे महाडीक यांचा खासदारकीचा विजय सोपा झाला. परंतू निवडणूकीनंतर तत्कालीन गृह राज्यमंत्री असुनही सतेज पाटील यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपल्याला कमी मताधिक्य मिळाल्याचा आरोप खा. महाडीक यांनी केला. त्यावरून दोघांत पुन्हा ‘अंतर’ पडत गेले. 

दरम्यानच्या काळात खासदार महाडीक व आमदार मुश्रीफ यांचेही 2015 मधील विधानसभा व महापालिका निवडणूकीवरून बिनसले. तर कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणातून सतेज पाटील व मुश्रीफ जवळ आले. त्यांच्यात ‘राजकीय सख्य’ वाढले. खासदार महाडीक पक्ष वाढीत लक्ष देत नसल्याचा जाहीर आरोप मुश्रीफ करू लागले. त्यानंतर मुश्रीफ हे तर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनाच लोकसभा निवडणूकीसाठी ‘प्रमोट’ करू लागले. सतेज पाटील यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे महाडीक व मुश्रीफ यांच्यात दरी वाढत गेली. ती इतकी की महाडीक हे राष्ट्रवादीतून लढणार नाहीत अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली. ‘राष्ट्रवादी’ऐवजी महाडीक यांची ‘भाजप’ला पसंती असल्याचे सांगण्यात येऊ लागली. अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा दोनवेळा जिल्ह्यात दौरा झाला. त्यानंतर मुश्रीफ व महाडीक यांचे बोलणे सुरू झाले. मात्र महाडीक यांच्यापेक्षा मुश्रीफ यांना सतेज पाटील हेच जवळचे असल्याचे सध्याचे चित्र आहे. परिणामी महाडीक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी त्यांच्या पाठिशी राष्ट्रवादीचे सर्वच नेतेमंडळी पूर्ण ताकदीनिशी उभारणार का? सतेज पाटील हे 2014 सारखी महाडीक यांना साथ देणार का? आणि जरी दोघे पक्षाचे आदेश म्हणून महाडीक यांच्या पाठिशी राहीले तरी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मागे जातील का? असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. 

सतेज पाटील यांची काँग्रेसमध्ये मुसंडी...  

एकेकाळी संपूर्ण कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमय होता. परंतु, काळानुसार त्यात बदल होत गेला. शिवसेनेचा शिरकाव झाला. नंतर भाजप आले. एकेकाळी बारा आमदार दिलेल्या जिल्ह्यात आता तर एकही आमदार काँग्रेसचा नाही. त्यातच गेल्या काही वर्षांपासून जिल्हा वर्चस्ववादातून काँग्रेस गळीतगात्र झाली आहे. इचलकरंजी परिसरात कल्‍लाप्पाण्णा आवाडे व कुटुंबीयांची काँग्रेस वेगळी होती. माजीमंत्री जयवंतराव आवळे यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांचा सवतासुभा आहे. आमदार सतेज पाटील यांनी मात्र विधानसभेतील पराभवानंतर उभारी घेतली. विधान परिषदेत महादेवराव महाडिक यांचा पराभव करून जिल्ह्याच्या राजकारणात पाय पसरायला सुरुवात केली. आवाडे व पी. एन. यांच्यातीत मतदेभ दूर करून काँग्रेस एकसंध ठेवण्यात पुढाकार घेतला. आता तर बंटी पाटील यांनी जनसंघर्ष यात्रेची सुरुवात कोल्हापुरातून घेऊन काँग्रेसमय वातावरण करण्यात पुढाकार घेतला. कारण जनसंघर्षच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या राज्यातील प्रत्येक नेत्याच्या तोंडी फक्‍त बंटी पाटील यांचेच नाव होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात बंटी पाटील यांनी जोरदार ‘मुसंडी’ मारली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

महादेवराव महाडिक काँग्रेसमध्ये तर...

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण केलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजेच पक्ष असल्याची स्थिती आहे. महादेवराव महाडिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा सर्वच पक्षांशी घरोबा आहे. काँग्रसेमधून विधान परिषदेवर गेलेले महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक हे भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. तर दुसरे पुत्र स्वरूप महाडिक हे ताराराणी आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. पुतणे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीतून खासदार झाले आहेत. असे असले तरी ‘राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो’ ही म्हण महाडिक यांच्याबाबतीत अनेकवेळा जिल्ह्याने अनुभवली आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ‘वजाबाकीची गणिते’ ठरविणारी त्यांची हक्‍काची मते आहेत. त्यामुळे अनेकांना महाडिक जवळचे वाटतात, हेही तितकेच खरे आहे. त्याचा फायदा महाडिकांना नेहमी होत आला आहे.