Wed, Mar 27, 2019 06:03होमपेज › Kolhapur › खोट्या घोषणा करणारे सरकार उलथवून टाका

खोट्या घोषणा करणारे सरकार उलथवून टाका

Published On: Sep 01 2018 1:46AM | Last Updated: Sep 01 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राफेल विमानाच्या खरेदीपासून ते नोटा बंदी, जीएसटीसारखा निर्णय घेताना, खोटे बोल; पण रेटून बोल, हाच मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. अशी खोटी आश्‍वासने आणि खोट्या घोषणा करणार्‍या या सरकारला उलथवून टाका, असे आवाहन शुक्रवारी कोल्हापुरात काँगे्रस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित भव्य सभेत काँग्रेस नेत्यांनी केले.

सरकारविरोधातील काँगे्रसच्या जनसंघर्ष यात्रेची जल्लोषी सुरुवात शुक्रवारी कोल्हापुरातून झाली. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत सर्वच काँगे्रस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी व सामान्य जनतेविरोधातील चुकीच्या कामकाजाचा पर्दाफाश केला. 

धर्मांध शक्तीशी विचाराने लढा : मल्लिकार्जुन खर्गे
यावेळी लोकसभेतील काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, कोल्हापुरातून सुरू झालेली ही जनसंघर्ष यात्रा नक्कीच यशस्वी होईल. कारण सर्व जण संघटित आहेत. देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणे आवश्यक आहे. काँग्रेस पक्ष हा समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेचा पक्ष आहे; पण विरोधात धर्मांध शक्ती आहे, त्यांच्याशी विचारानेच लढाई करावी लागेल. 

‘मंजील बहूत दूर है, रास्ता भी कठिन है, फिर भी हमे मंजील तक पहुँचना है’, असे सांगून खर्गे म्हणाले, देशाचे संविधान बदलण्याची भाषा होते, हा लोकशाहीला धोका आहे; पण त्यावर पंतप्रधान मोदी सभागृहात काहीच बोलत नाहीत. बदलण्यासाठी आलो आहोत म्हणतात, मात्र मोदी शांत बसतात. दलित, अल्पसंख्याक महिलांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे, तरीही मोदी काहीच बोलत नाहीत. राफेल विमानाच्या किमतीवर आक्षेप घेतला, तर त्यावरही संसदेत मोदी बोलत नाहीत. उलट अंबानी, अदानी यांच्याविरोधात बोलणार्‍यांनाच नोटिसा पाठवल्या जातात, या प्रश्‍नात या उद्योजकांची लुडबूड का?

दहशतवाद कायम
ते म्हणाले, नोटा बंदीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोध केला; पण त्यांच्यावरच टीका झाली. या निर्णयाने विकास दर घटणार असल्याचे संकेत दिले होते; पण त्यांचे ऐकले नाही आणि आज नोटा बंदीचा परिणाम दिसत आहे. दहशतवाद संपवण्यासाठी, काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटा बंदी असल्याचे मोदी सांगत होते, यातील एक तरी गोष्ट पूर्ण झाली का, याचे उत्तर त्यांनी सभागृहात द्यावे; पण आता रिझर्व्ह बँकेनेच नोटा बंदी फसल्याचे जाहीर केले आहे. भ्रष्टाचार आणि दहशतवाद आजही कायम आहे.

भाजप घोषणांचा कारखाना : खा. अशोक चव्हाण
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, आगामी काळात जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम आपल्याला करावे लागेल. त्या आशेने ही जनता आपल्याकडे बघत आहे. सध्या सामाजिक परिस्थिती स्फोटक बनत आहे. त्याला सरकार जबाबदार असून, 2019 च्या निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा घराघरांपर्यंत पोहोचवून हे सरकार खाली खेचण्यासाठी तयार रहा.

भाजप म्हणजे घोषणांचा कारखाना असल्याचे सांगून 
चव्हाण म्हणाले, मोदी भाई और बहनों विसरले आहेत. 15 लाखांचे आश्‍वासन म्हणजे जुमला होता, असे पक्षाध्यक्ष अमित शहा म्हणतात. सरकारची आश्‍वासने ही निवडणुकीची चाल असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणतात; पण यांच्या खोटेपणामुळे देशाची मात्र राखरांगोळी झाली आहे. महिला अत्याचारात राज्य आघाडीवर, उद्योगात राज्याचा क्रमांक 13 वा ही राज्य सरकारची सांगण्यासारखी कामे. बेटी बचाओचा नारा दिला; पण आज त्यांच्याच आमदार आणि कार्यकर्त्यांकडून महिलांवर अत्याचार सुरू असल्याने भाजपकडूनच बेटी बचाओ म्हणण्याची वेळ आली आहे. 

कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?
विचारवंतांच्या एकीकडे हत्या होत असताना, त्याला जबाबदार असणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी आम्ही घालत आहोत, त्याकडे दुर्लक्ष करून पुरोगामी विचारवंतांनाच नक्षलवादी ठरवून, त्यांना अटक केली जात आहे. निवडणुकीपूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा सवाल भाजपने केला. आता आम्ही त्यांना विचारतो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, त्याचे उत्तर द्या, असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

निवडणुकीत जाब विचारा
पंतप्रधानांची लोकप्रियता कमी झाली म्हणूनच लोकसभेसोबत काही राज्यांच्या निवडणुका घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करून चव्हाण म्हणाले, देशातील सामान्य माणूस तर सोडाच; पण न्यायाधीशही खूश नाहीत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. या सगळ्यांचा जाब येणार्‍या निवडणुकीत संबंधितांना विचारा आणि काँगे्रसला विजयी करा.

आता लोक फसणार नाहीत : पृथ्वीराज चव्हाण
माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतकर्‍यांंचे उत्पन्न दुप्पट करेन, सातबारा कोरा करेन, उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने लोकांना दिले होते, त्याचे काय झाले? नोटा बंदीचा निर्णय मूर्खपणाचा आहे, हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहे. हे आता रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. नोटा बंदीचा निर्णय काळा पैसा पांढरा करण्यासाठीच होता, असा केलेला आरोप खराच आहे. नोटा बंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेवर, शेतकर्‍यांवर, शेतमजुरांवावर हल्ला होता. त्यातून देश अजूनही सावरलेला नाही. दोन कोटी रोजगार देण्याची भाषा करणारे भाजप सरकार आहे ते रोजगार टिकवू शकले नाही. सरकारची फसवाफसवी सुरू आहे. आता लोक फसणार नाहीत. दिलेली अश्‍वासने बोगस होती, हे लोकांच्या लक्षात आले आहे. म्हणून लोकशाही वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी मोदी सरकारला खाली खेचले पाहिजे. जर या सरकारला सत्तेवरून दूर केले नाही, तर सध्या जी अघोषित आणीबाणी सुरू आहे, ती अघोषित राहणार नाही. लोकशाही संपवून टाकतील, म्हणून सर्व विरोधक एकत्र येत आहेत. हा हुकूमशहा पुन्हा सत्तेवर आला, तर पुन्हा निवडणूक होणार नाही. हुकूमशाही सुरू होईल. त्याच्याविरोधात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आता ठिणगी पडली आहे, त्याचा ज्वालामुखी संपूर्ण राज्यात होईल.

‘सध्या चोराच्या उलट्या’ : विखे-पाटील
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहूरायांच्या पुरोगामी नगरीतून कोणत्याही गोष्टीची सुरुवात केली की, ते शेवटच्या लोकांना पण मान्य होते. त्यामुळेच भाजप विरोधातील जनसंघर्ष यात्रेची सुरुवात करवीरनगरीतून केली आहे. सध्या चोराच्या उलट्या... सुरू आहेत. खोटं बोल; पण रेटून बोलण्याची सवय असणार्‍या या मंडळींपासून आता आपण सावध राहिले पाहिजे. दोन कोटी रोजगार देऊ, असेे आश्‍वासन दिले; पण दोन लाखांनाही रोजगार मिळाला नाही.  सरकारचा ढोंगीपणा उघड होत आहे. तो या यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पुरोगामी विचारवंतांचे हल्लेखोर पाच वर्षे झाले तरी सापडत नाहीत. मात्र, भीमा-कोरेगाव दंगलीत विचारवंतांना अटक केली जाते. या मनुवादी प्रवृत्तीविरुद्ध लढा  देण्यासाठी  सर्वांनी निर्भयपणे उभे राहिले पाहिजे. सांंंगलीच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, बक्षीस वाटा, माल वाटा, असे म्हणत होते. त्यांच्याकडे एवढे पैसे आले कोठून? उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेवर नियंत्रण राहिले नाही. त्यांनी आतापर्यंत 231 वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे; पण ते बाहेर पडू शकत नाहीत, सत्तेसाठी ते लाचार आहेत.

सरकारविरोधात प्रचंड असंतोष : थोरात
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सध्याच्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनामध्ये प्रंचड असंतोष आहे. त्याचा उठाव करण्याची गरज आहे. शेतकरी, बेरोजगार, ऊस उत्पादक, दूध उत्पादक यांच्यासाठी या सरकारने काही केले नाही. कर्जमाफीची केवळ घोषणा झाली. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालीच नाही. केवळ धर्माच्या नावावर राजकारण करणार्‍या या भाजपला रोखले पाहिजे. आजच्या  जनसंघर्ष सभेने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सभेचे आयोजन करणारे आ. सतेज पाटील तरुण आहेत. राज्यात त्यांना अतिशय चांगले भविष्य आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी त्यांच्या मागे ताकद उभी करावी.

चुकीच्या सरकारला निवडून दिले : हर्षवर्धन पाटील
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशात व महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत चुकीच्या सरकारला आपण निवडून दिल्याची जाणीव जनतेला झाली आहे. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याने काँग्रेस पक्षाला जनसंघर्ष यात्रा काढावी लागत आहे. महाराष्ट्रात सध्या सर्वत्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काँग्रेस सरकारची सत्ता असताना ज्या महाराष्ट्रात विकास कामांची चर्चा होत होती, त्या महाराष्ट्रात आज जातीय दंगली होत आहेत. दहा वर्षांत काँग्रेस सरकारने केलेल्या कामांची आठवण जनतेला पुन्हा होत आहे.

लक्ष विचलित करण्यासाठी खोटे आरोप : केतकर
ज्येष्ठ पत्रकार खा. कुमार केतकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करून काही लोकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे; पण ते सत्य नाही. मोदी यांच्याकडे जनतेला फसवण्याचे कोणतेच अस्त्र राहिलेले नाही. सनातन संस्थेच्या काही लोकांना पकडले आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी असे खोटे आरोप केले जात आहेत.

यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, आ. विश्‍वजित कदम, माजी मंत्री नसिम खान, आ. बसवराज पाटील, शरद रणपिसे यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर महापौर शोभा बोंद्रे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, प्रकाश आवाडे, रामहरी रूपनवार, माजी आमदार दिनकर जाधव, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाम, प्रवक्ते सचिन सावंत, संजय डी. पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, राजू वाघमारे, पृथ्वीराज साठे, प्रकाश सातपुते, तौफिक मुल्लाणी, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, पार्थ मुंडे, दीपक थोरात यांच्यासह महापालिकेतील काँगे्रसचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

म्हणाल तो उमेदवार देऊ; पण विजय हवा : अशोक चव्हाण
कोल्हापूर लोकसभेची जागा काँगे्रसला घ्या, उमेदवार विजयी करू, या सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत अशोक चव्हाण म्हणाले, तुम्ही म्हणाल तो उमेदवार काँग्रेसला देऊ. मात्र, विजय मिळवून दिला पाहिजे. जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा काँग्रेसच्या निवडून आणा, हा जगन्नाथांचा रथ सर्वांच्या सहकार्याने पुढे न्या.