Thu, Apr 25, 2019 12:24होमपेज › Kolhapur › 'शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाखरेदीचे कर्ज माफ करा'

'शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाखरेदीचे कर्ज माफ करा'

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शेतकरी कर्जमाफीप्रमाणे रिक्षाचालकांनी रिक्षा खरेदीसाठी घेतलेले कर्ज माफ करावे अशी मागणी कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा चालक व असंघटीत क्षेत्र कामगार संघाने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी सुभेदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात तीन आसनी रिक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे काम करत आहेत. रिक्षा हा व्यवसाय नसून ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक प्रमुख घटक आहे. शासनाचे यावर नियंत्रण आहे. परंतू शासनदरबारी सातत्याने दुर्लक्षीत आहे. शहरात अंदाजे नउ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. तेवढ्याच विनापरवाना आहेत. विना परवाना रिक्षा शासनाचे कोणतेही कर न भरता आरटीओ पोलीस यांचे नियम न पाळता व्यवसाय करतात. मात्र परवानाधारक रिक्षाचालकांना   दहाबारा तास व्यवसाय केल्यानंतर जेमतेम 10 ते 15 ग्राहक मिळतात. त्यातून केवळ 400 ते 500 रुपये व्यवसाय होतो. यामधून इंधन 200 रुपये, विमा 30 रुपये, टायर झीज 10 रुपये, देखभाल दुरुस्ती  20 रुपये, ऑईल दहा रुपये, पासिंग पाच रुपये, तर घरखर्च 150 रुपये असा एकत्रित खर्च पाहता कमाईपेक्षा जास्त खर्च आहे.त्यामुळे रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्‍ता तीन हजार रुपये परतफेड होत नाही. त्यामुळे रिक्षाचालक कर्जबाजारी झाला आहे. शिक्षण कमी असल्याने पर्यायी नोकरी करता येत नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी कर्जमाफीप्रमाणे रिक्षाचे कर्ज माफ करावे, पंतप्रधान आवास योजनेत रिक्षा व्यवसायिकांसाठी घरकुले आरक्षीत करावीत. 

अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात अविनाश दिंडे, जाफर मुजावर, चंद्रकांत ओतारी  यांचा समावेश आहे. 

Tags : kolhapur, kolhapur news, common man auto rikshaw driver organisation, farmers lone waive, demand of auto rickshaw lone waive