Tue, Apr 23, 2019 02:07होमपेज › Kolhapur › तर सरकारमधून बाहेर पडू : उद्धव

तर सरकारमधून बाहेर पडू : उद्धव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सरकारने दिलेली आश्‍वासने पूर्ण झाली आहेत की नाही, हे पाहण्यासाठी राज्याचा दौरा करत आहे. जनतेच्या व्यथा-वेदना जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संसदेत, विधानसभेत आवाज उठवणार आहे. मात्र, त्यातूनही जर समस्या सुटल्या नाहीत तर वेगळा विचार करू, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे सरकारमधून बाहेर पडण्याचाच इशारा पत्रकार परिषदेत दिला.

काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले नाहीत. त्यामुळे सरकार बदलले. जर नवीन सरकारही हे प्रश्‍न सोडवण्यास असमर्थ ठरत असेल, तर या सरकारलाही नालायकच म्हणावे लागेल, असा सणसणीत टोला ठाकरे यांनी लावला. यावेळी विधान परिषद निवडणूक, नारायण राणे यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नांना ठाकरे यांनी बगल दिली.

कर्जमाफी मिळालेला शेतकरी भेटला नाही

कर्जमाफीची घोषणा केली असली तर अजून कर्जमाफी मिळालेला शेतकरी भेटलेला नाही. आतापर्यंत केवळ चार हजार शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला आहे. 89 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा, तर 40 लाख शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. ऑनलाईन प्रक्रिया करून आतापर्यंत केवळ चार हजार शेतकर्‍यांनाच लाभ मिळाला असेल, तर 40 लाख आकडा कधी गाठणार? असा प्रश्‍न करत हे सर्व पाहिल्यानंतर छत्रपतींचे नाव असलेल्या योजनेत घोटाळा होऊ नये, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्‍त केली.

मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालावे

राज्यातील कायदा-सुव्यवस्था गंभीर बनली आहे. पोलिसांना बदनाम करणारी त्यांच्यातील प्रवृत्ती वेळीच थांबवली पाहिजे. मंजुळा शेट्ये प्रकरण, सांगली प्रकरण तसेच भाजपच्या आमदाराकडे मागितलेली खंडणी हे सर्व प्रकार गंभीर आहेत. राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून वेळीच आवरले नाही, तर या लोकांची दरोडेखोरी सुरू होईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस ना. विजय शिवतारे, खा. गजानन कीर्तीकर, खा. विनायक राऊत, दगडू सकपाळ, आ. चंद्रदीप नरके उपस्थित होते.