Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : अमली पदार्थांचे सेवन करून धिंगाणा; कॉलेज तरुण, तरुणी ताब्यात

कोल्हापूर : अमली पदार्थांचे सेवन करून धिंगाणा; कॉलेज तरुण, तरुणी ताब्यात

Published On: Jun 23 2018 1:57AM | Last Updated: Jun 23 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अंमली पदार्थांचे सेवन करून टाकाळा येथील जलतरण तलावाजवळील उद्यानात बेधुंद अवस्थेत धिंगाणा घालणार्‍या तीन कॉलेज तरुणांना व एका तरुणीला राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बारा ग्रॅम गांजा, सिगारेटची पाकिटे, लायटरसह अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 

दिग्विजय उमेश पाटील (22, रा. ताराबाई पार्क), पद्मराज धनंजय आवटी (रा. माळी कॉलनी, टाकाळा), शुभम संगाप्पा गाडवी (टाकाळा) अशी त्यांची नावे आहेत. पुण्यात विमाननगर परिसरातील 22 वर्षीय तरुणीलाही पोलिसांनी बेधुंद स्थितीत ताब्यात घेतले. पोलिसांची कारवाई सुरू असतानाच कोल्हापुरात शिक्षण घेणारी तरुणी मोपेडवरून पसार झाल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.

रात्री उशिरा राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल     झाला आहे. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांना चकवा देत पसार झालेल्या तरुणीलाही ताब्यात घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. रात्री उशिरा सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

संशयित तरुण शहरातील विविध कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. तर पुण्यातील तरुणी बीबीए अभ्यासक्रमासाठी पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापुरात आली आहे. पसार झालेली तरुणी कसबा बावडा येथील असल्याची माहिती असली तरी प्रत्यक्षात ताबा घेतल्यानंतर तिचा ठावठिकाणा निष्पन्न होईल, असेही तपासाधिकार्‍यांनी सांगितले.

टाकाळा येथील जलतरण तलावाजवळील उद्यानात दोन तरुणींसह पाच जण उघड्यावर अंमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळाली. महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, कविता घारगे, शोभा कुंभार, दीपाली कांबळे, नीलेश डोंगरे, युवराज पाटील, रामचंद्र पांडे यांच्या पथकाने सायंकाळी साडेचारच्या सुमाराला छापा टाकला.

पोलिसांची चाहूल लागताच तरुणीसह पाचही संशयितांनी पलायनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पुण्यातील तरुणीने उद्यानालगत एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तर आणखी एका तरुणीने मोपेडवरून पलायन केले.

चौघांना ताब्यात घेतल्यानंतर घटनास्थळी गांजाच्या तीन पुड्या, तीन भरलेली व एक रिकामे सिगारेट पाकीट, प्लास्टिकची रिकामी डबी हस्तगत करण्यात आली. पुण्यातील तरुणी उच्चभ्रू घराण्यातील असून तिचे वडील परदेशी कंपनीत उच्चपदस्थ आहेत. तीनही तरुण उच्चभ्रू असल्याचे औदुंबर पाटील यांनी सांगितले.