होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात पहिल्या सहकार हॉस्पिटलची तुरंबेत स्थापना

जिल्ह्यात पहिल्या सहकार हॉस्पिटलची तुरंबेत स्थापना

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:23AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात पहिल्या सहकार हॉस्पिटलची स्थापना तुरंबे (ता.राधानगरी) येथे होणार आहे. येत्या 3 फेब्रुवारीस या हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. भीष्म सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे उपस्थित होते.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, जिजामाता को-ऑप. हॉस्पिटल या संस्थेच्या माध्यमातून तुरंबे येथे 42 कॉटचे हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या हॉस्पिटलचे 800 पेक्षा अधिक सभासद झाले आहेत. विविध सहकारी संस्था, त्यांचे सभासद, कारखाना कर्मचारी आदींना भविष्यात सभासद करून त्यांना औषधोपचारास 20 टक्के सवलत दिली जाणार आहे. या हॉस्पिटलसाठी 13 सदस्यांची व्यवस्थापक समिती असून, 7 सदस्य डॉक्टर्स असणार आहेत. परवडणार्‍या दरात चांगली वैद्यकीय सेवा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओपीडी, लॅब टेस्ट, जनरल वॉड, स्पेशल रूम, आयसीयू आदीसाठी सवलत दिली जाणार आहे.

जिल्हा उपनिबंधक काकडे म्हणाले, जिल्ह्यात 55 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. सहकारी हॉस्पिटलची कमतरता होती. ती भरून निघाली आहे. शहरात जागांचे दर खूपच असल्याने ग्रामीण भागात हे हॉस्पिटल काढण्याचा निर्णय झाला. शासन स्तरावरून या हॉस्पिटलसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. भागधारकांना हॉस्पिटलच्या माध्यमातून सवलत देण्यात येणार आहे. कमीत कमी पैशात चांगले उपचार हा एकमेव उद्देश ठेवून या हॉस्पिटलची उभारणी केल्याचे त्यांनी सांगितले. 

‘गोकुळ’चे संचालक डोंगळे म्हणाले, गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी हे हॉस्पिटल निश्‍चितच उपयोगी ठरेल. भविष्यात या हॉस्पिटलची कोल्हापुरातही शाखा काढण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.