Tue, Mar 19, 2019 09:22होमपेज › Kolhapur › स्वच्छता अभियान यशस्वीतेसाठी मुरगूड नगरपालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

स्वच्छता अभियान यशस्वीतेसाठी मुरगूड नगरपालिकेचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:36PM

बुकमार्क करा
मुरगूड : प्रतिनिधी

स्वच्छ भारत अंतर्गत मुरगूड नगरपालिका देशात टॉप टेनमध्ये येण्यासाठी स्वच्छता अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. यासाठी पालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी झोकून देऊन स्वच्छतेसाठी झटत आहेत. या अभियानाला लोकसहभागासाठी उदंड असा मिळत आहे. सर्व प्रभागांसाठी स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 40 लाखांची बक्षिसे जाहीर केली आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्रचा नारा सर्वत्र सुरू आहे. मुरगूड नगरपालिकेने या स्वच्छता स्पर्धेत सहभाग नोंदवला असून राज्यात नोव्हेंबर देशात टॉप टेनमध्ये येण्यासाठी नगरपालिकेने पद्धतशीर नियोजन केले आहे. विशेष म्हणजे या अभियान यशस्वीतेसाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, महिला बचत गट यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. काही बँका व नागरिक दानशूर व्यक्तींनी अर्थसहाय्यही या अभियानाला केले आहे. 

प्रत्येक प्रभागातून स्वच्छता राखण्यासाठी पालिकेचे दोनशे सफाई कामगार रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी पडून राहणारा कचरा उठाव होऊन शहर स्वच्छ व चकाचक दिसत आहे. पालिका पदधिकारीही या मोहिमेत सहभागी  होत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा नारा आणि कृती याला जोड मिळत आहे. 

ओला व सुका कचरा साठविण्यासाठी घरोघरी कचरा कुंड्या ठेवल्या जात असून नगरपालिकेच्या चार घंटागाड्या फिरून तो कचरा जमा करत आहेत. त्यामुळे शहरातील कचरा हद्दपार झाला आहे. कचरा कोंडाळ्याचा तर नामोनिशाणासुद्धा दिसत नाही. सांडपाणी वाहणार्‍या गटारीसुद्धा साफ करण्यात आल्याने सांडपाणी कोठे साचून राहत नाही व दुर्गंधीही नाही. त्यामुळे शहर स्वच्छतेबरोबर आरोग्य दायी वातावरण देणारे मुरगूड शहर झाले आहे. पहाटेपासूनच स्वच्छता करणारे सफाई कामगार चर्चेत आले असून त्यांच्या परिश्रमाचे कौतुक होत आहे. 

नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, मुख्याधिकारी संजय गायकवाड, आरोग्य विभाग प्रमुख अनिल गंदमवाडे हे स्वच्छता मोहिमेवर विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छता पाहणी शासकीय पथक लवकरच या शहराला भेट देणार आहे. त्यांच्याकडून मिळणार्‍या गुणावरच हे अभियान यशस्वी ठरणार आहे. 

नागरिकांबरोबरच नगरसेवक, पालिकेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग या स्वच्छता अभियानामध्ये गुंतल्याचे दिसत आहे.