होमपेज › Kolhapur › शिवछत्रपतींना अभिवादनासाठी शहर एकवटले

शिवछत्रपतींना अभिवादनासाठी शहर एकवटले

Published On: Jun 07 2018 2:05AM | Last Updated: Jun 07 2018 1:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सर्व जाती-धर्मिय रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शहर एकवटले. निमित्त होतं अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित शिवराज्याभिषेकदिनाचे. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षीप्रमाणे या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. 
शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, प्रबोधनपर  फलक, वारकर्‍यांची भजने, घोड्यावर स्वार मावळे, पारंपरिक वाद्ये आणि ‘जय जिजाऊ-जय शिवराय’चा अखंड जयघोष अशा वातावरणात बुधवारी ही मिरवणूक झाली. नूतन महापौर सौ. शोभा बोंद्रे व  खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन झाले.

यावेळी  उपमहापौर महेश सावंत,  मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी महापौर आर. के. पोवार, उद्योजक चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष शंकरराव शेळके, शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई, डॉ. संदीप पाटील, महादेव पाटील, अवधूत पाटील, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, साजिद मेस्त्री, बाळासाहेब भोसले, सोमनाथ घोडेराव आदी उपस्थित होते.

मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून डॉल्बीमुक्‍त आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक सजविलेली मूर्ती होती. युवती, महिला भगव्या साड्या व फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवछत्रपती वृक्षसंवर्धन विषयक आज्ञापत्र, गडावरील पाण्याचा थेंब न थेंब साठवून, पाणी म्हणजे जीवन हा आदर्श घालून देणारे शिवराय, थोर पुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करून नका आणि चला स्वच्छ सुंदर कोल्हापूरसाठी संकल्प करुया या आशेयाचे प्रबोधनात्मक फलक मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. सामाजिक कार्याची माहिती स्क्रीनच्या माध्यमातून प्रदर्शित केली जात होती.  छत्रपती शिवराय व संत तुकाराम महाराज यांच्या स्वधर्म व स्वराज्याच्या संकल्पनेला उजाळा देण्यासाठी वारकरी पथकही सहभागी झाले होते. मंगळवार पेठ, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे शिवभक्‍तांच्या उपस्थितीत ही मिरवणूक शिवाजी चौकात येऊन तिची सांगता झाली. 

विद्यापीठात अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील शिवपुतळ्यास बुधवारी मान्यवरांनी पुष्प वाहून अभिवादन केले.  यावेळी  प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी  व्ही. टी. पाटील, प्रा. डॉ. विजय ककडे आदी उपस्थित होते.दरम्यान, शहरातील शिवभक्‍तांनी खास बंगळूरहून तयार करून आणलेल्या गुलाबपुष्पांचा हार शिवपुतळ्यास अर्पण केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी संताजी घोरपडे, धैर्यशील यादव, अमर लाड आदींनी पुढाकार घेतला.