Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Kolhapur › शहरात विकासकामे कधी होणार?

शहरात विकासकामे कधी होणार?

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:37PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

स्टॉर्म वॉटरच्या कामावर अजून सही झालेली नाही. डेंग्यूचे पेशंट सापडत आहेत. नागरिकांच्या रोषास नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. फाईल ट्रॅकिंगचे काय झाले. दोन वर्षे झाली, प्रभागांत कामे झालेली नाहीत. सहा महिने या टेबलवरून त्या टेबलला फाईल फिरते. अशामुळे शासनाकडून आलेला निधी परत जाईल, अशी भीती नगरसेवकांनी व्यक्‍त केली. तसेच शहरात विकासकामे होणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित करून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

सभापती संदीप नेजदार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. जयश्री चव्हाण, रिना कांबळे, अफजल पीरजादे, प्रतिज्ञा निल्ले, दिलीप पोवार आदी चर्चेत सहभागी झाले. प्रशासनाच्या वतीने कोणत्याही फाईलवर अंतिम निर्णय आयुक्‍त घेतील. फाईलवर लवकरात लवकर निर्णय होऊन पुढे प्रस्तावित करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देऊ, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आयुक्‍त सभेला आले नसल्याने नगरसेवकांनी संतप्‍त भावना व्यक्‍त केल्या. 

डॉ. वाईकर यांच्या परवान्याबाबत माहिती द्या, एम.एस. सर्जनना न्यूरो सर्जनचे ऑपरेशन करता येते का? त्यांनी ऑपरेशन केले? त्यांच्यावर काय कारवाई केली? हॉस्पिटल सील करा, अशी मागणी सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने डॉ. वाईकर यांच्याकडे एम.एस. जनरल सर्जनची पदवी आहे. त्यांना ऑपरेशन करता येत नाही. याबाबत त्यांना नोटीस काढली आहे. शहरस्तरीय समिती स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्ष आयुक्‍त आहेत. त्यांच्याकडे प्रस्ताव सादर करू. नोटिसीची मुदत शुक्रवारी सायंकाळी 6 पर्यंत आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 

ब्लड बँकेबाबत काय निर्णय झाला? विषयपत्रिकेवर ब्लड बँकेचा विषय नव्हता, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव सादर केला आहे, असे सांगण्यात आले. टिंबर मार्केट, लोळगे लॉन येथील ले-आऊटमधील नियोजित डी.पी. रोडवरील अनधिकृत प्लॉट विकले आहेत. प्लॉट अनधिकृत आहेत. तेथे महापालिकेचा रस्ता आहे, असा आरोप सदस्यांनी केला. प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाने 1999 ला डी.पी. रोड मंजूर केला आहे. डेव्हलपमेंट प्लॅन रिवाईज होणार आहे. त्यावेळी निर्णय घ्यावा लागणार आहे. पुढील सभेत माहिती देऊ, असे स्पष्ट करण्यात आले.