Sat, May 30, 2020 23:13होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : चित्री मध्यम प्रकल्पाची चारही आवर्तने पूर्ण

कोल्हापूर : चित्री मध्यम प्रकल्पाची चारही आवर्तने पूर्ण

Last Updated: May 23 2020 10:54AM
सोहाळे :  पुढारी वृत्तसेवा 

आजरा तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पातील शेती पिकांना दिल्या जाणार्‍या पाण्याची चारही आवर्तने गुरुवारी पूर्ण झाली. चार आवर्तनाच्या माध्यमातून चित्रीतून एकूण १४०४ द. ल. घ. फू. इतके पाणी सोडण्यात आले. सद्यपरिस्थितीत चित्रीमध्ये गतवर्षीपेक्षा पाच टक्के जादा पाणी असून, ४८७ द. ल. घ. फू. म्हणजे २६ टक्के पाणी शिल्लक आहे. 

वाचा :कोल्हापुरात आणखी २ रुग्ण; संख्या २६१ वर

चालु वर्षी सुरुवातीपासूनच चित्री मध्यम प्रकल्पातील पाण्याचे नियोजन कोल्हापूर पाटबंधारे (दक्षिण) विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. स्मिता माने, उपविभागीय अधिकारी बी. एम. पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता एन. डी. मळगेकर यांनी चांगल्या प्रकारे केले. १८८६ द. ल. घ. फू. क्षमतेच्या चित्री मध्यम प्रकल्पातील पाण्याचा उपयोग आजरा तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्यातील गावांना सिंचनासह पिण्यासाठी होतो. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून पाण्याची गरज बघून पाणी सोडण्यात आले आहे. चालुवर्षातील आतापर्यंतची चार आवर्तने झाली असून पहिले आवर्तन हे दि.२३ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी असे १८ दिवसांचे होते. पहिल्या आवर्तनात ३३८ द. ल. घ. फू. पाणी सोडण्यात आले. 

दुसरे आवर्तन हे दि. २४ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च असे २३ दिवसांचे होते. या दुसर्‍या आवर्तनात ३८९ द. ल. घ. फू. पाणी सोडण्यात आले. तिसरे आवर्तन हे दि. २७ मार्च ते दि. १४ एप्रिल असे १९ दिवसांचे होते. या तिसर्‍या आवर्तनात धरणातील ३१६ द. ल. घ. फू. पाणी सोडण्यात आले. चौथे आवर्तन हे दि. २९ एप्रिल ते दि. २० मे असे २२ दिवसांचे होते. या चौथ्या आवर्तनात चित्री व एरंडोळमधील ३६१ द. ल. घ. फू. पाणी सोडण्यात आले. पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेवून सध्या धरणातील पाणी कमी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे यंदा चौथ्या आवर्तनामध्ये चित्री प्रकल्पातील ३२९ द. ल. घ. फू. व एरंडोळ लघु पाटबंधारे प्रकल्पातील ३२ द. ल. घ. फू. पाणी सोडले आहे. त्यामुळे सध्या एरंडोळ धरणात ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.   

चालु वर्षातील पिकांकरिताच्या पाण्याची चारही आवर्तने पुर्ण झाली असून, चित्रीतील एकूण १४०४ द. ल. घ. फू. पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षीपेक्षा चालुवर्षी आजतारखेला चित्री मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून पाच टक्के जादा पाणी आहे. ४८७ द. ल. घ. फू. म्हणजे २६ टक्के सध्या प्रकल्पात पाणीसाठा आहे. याशिवाय धनगरवाडी धरणात १७ टक्के व  खानापूर लघु पाटबंधारे प्रकल्पात २३ टक्के इतका पाणीसाठा आहे.

बरगे काढण्याच्या कामाला सुरुवात

सर्फनाला प्रकल्पावरील साळगाव, देवर्डे, दाभिल व सुळेरान बंधार्‍यांचे बरगे काढण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरु झाले आहे. या बंधार्‍यातील पाणी कमी झाल्याने बरगे काढण्याचे काम सुरु असून, दोन दिवसापुर्वीच आवर्तन बंद केल्याने चित्रीवरील बंधार्‍यांमध्ये अजून पाणीसाठा आहे. त्यामुळे चित्रीवरील बंधार्‍यांचे बरगे पाणी कमी झाल्यानंतर काढले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. 

जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा 

चित्री मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून सिंचनाकरिताची चारही आवर्तने पुर्ण झाली आहेत. आगामी काळात पाण्याची गरज भासल्यास पिण्याकरीता पाणी सोडले जाणार आहे. प्रकल्पात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचीही माहिती शाखा अभियंता एन. डी. मळगेकर यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

वाचा : पन्हाळा : बांबरवाडीतील युवकाला कोरोना, पण कुणाच्याही संपर्कात नाही