Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Kolhapur › चाळीस दिवस आधीच चित्री ‘ओव्हर फ्लो’

चाळीस दिवस आधीच चित्री ‘ओव्हर फ्लो’

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 22 2018 10:57PMआजरा : प्रतिनिधी 

आजरा व गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेला चित्री मध्यम प्रकल्प शनिवारी पूर्ण क्षमतेने भरला असून, गतवर्षीपेक्षा तब्बल चाळीस दिवस आधीच चित्री धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. चित्रीमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्याने आजर्‍यासह गडहिंग्लज तालुकावासीय शेतकरी सुखावले आहेत.

गेले पंधरा दिवस झालेल्या जोरदार पावसाने चित्री प्रकल्पामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,886 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला आहे. शनिवारी दिवसभरात प्रकल्प क्षेत्रात 91 मिलिमीटर पाऊस झाला, तर शनिवारअखेर 2,097 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. यामुळे सायंकाळच्या सुमारास चित्रीच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. चित्री प्रकल्पामुळे आजरा तालुक्यातील 31, तर गडहिंग्लज तालुक्यातील 23 गावांमध्ये 5,850 हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. चित्रीच्या  पाण्यावर अनेक गावांचा पाणी प्रश्‍न अवलंबून आहे. यावर्षी धरण लवकर पूर्ण क्षमतेने भरल्याने चित्री प्रकल्पस्तरीय असणार्‍या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. प्रतिसेकंद 465 क्युसेकने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर वीजनिर्मिती केंद्रामधून 180 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

चित्री प्रकल्पामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे हे वृत्त समजताच आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक वर्षा पर्यटकांनी चित्री प्रकल्पस्थळी भेट दिल्याने प्रकल्पस्थळी रविवारी दिवसभर पर्यटकांची गर्दी दिसत होती.