Tue, Feb 19, 2019 20:24होमपेज › Kolhapur › चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी जंगलाला आग

चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी जंगलाला आग

Published On: Mar 01 2018 1:39AM | Last Updated: Feb 28 2018 11:43PMकोवाड : वार्ताहर

चिंचणे, कामेवाडी, तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील हजारो हेक्टर मधील असलेल्या जंगलाला लागलेल्या आगीत दुर्मीळ व औषधी वनस्पती तसेच जंगली प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर या जंगलालगत असलेल्या चिंचणे गायरानमधील 65 हेक्टर जमिनीवर लागवड केलेल्या काजू व आंब्याची झाडे आगीत जळून खाक झाली. यामुळे सुमारे अंदाजे 30 लाखांहून अधिक आर्थिक फटका बसल्याचा अंदाज ग्रामपंचायतीने वर्तवला आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिकच तोट्यात गेली आहे. 

कर्नाटकातील दड्डी मरणहोळपासून महाराष्ट्रातील हडलगे, नेसरीपर्यंत असलेल्या हजारो हेक्टर जंगल अनेक वनस्पतींनी समृद्ध बनले होते. या जंगलामध्ये गवे, ससे, हरीण, काळवीट यांसारख्या वन्य प्राण्यांचा मोठा वावर आहे. मंगळवारी दुपारी कर्नाटकातील मर्णहोळ येथील शेतकर्‍यांनी जनावरांच्या चार्‍यासाठी या जंगलाला आग लावली. बघता-बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग महाराष्ट्रातील चिंचणे, कामेवाडीपर्यंत आली. या जंगलालगत असलेल्या गायरानामध्ये चिंचणे ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धन योजनेंतर्गत काजू व आंब्यांची जवळपास चार हजार वृक्षांची लागवड केली होती. 

या आगीमुळे ही सर्व झाडे नष्ट झाली आहेत. आग विझवण्यासाठी चिंचणे ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न अपुरे पडले. ही आग बुधवारी दुपारपर्यंत आटोक्यात आली  नव्हती. याचा सर्वाधिक फटका चिंचणे ग्रामपंचायातीला बसला असून सुमारे 30 लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. 

आगीचा पंचनामा कोवाड मंडल अधिकारी आर. डी. ठोंबरे व चिंचणे तलाठी उमेश भाटे यांनी केला. यावेळी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण उपस्थित होते. यावेळी सरपंच भाग्यश्री सुतार, पो. पा. बाळाप्पा व्हंकळी, उपसरपंच किरण पाटील, ग्रामसेविका एस. जे. मर्णहोळकर, विष्णू तरवाळ, नामदेव सुतार, रमेश पाटील, विठ्ठल बसवाणी पाटील, दुंडाप्पा इराप्पा तरवाळ, अमृत गुंडू पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.