Wed, May 22, 2019 06:57होमपेज › Kolhapur › ‘चिकोत्रा’च्या पाणीपातळीत 86 टक्के वाढ

‘चिकोत्रा’च्या पाणीपातळीत 86 टक्के वाढ

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 26 2018 11:00PMपिंपळगाव : वार्ताहर

गेली अनेक वर्षे झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा प्रकल्प पूर्ण क्षतेने भरत नसल्यामुळे परिणामी उपसा बंदी केल्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. शिवाय धरणाला लागलेली गळतीमुळे पाणीसाठी केवळ 60 ते 70 टक्कयापर्यंतच असयचा, पण यंदा झालेला समाधानकारक पाऊस आणि गळती रोखण्यात पाटबंधारे खात्याच्या अभियांत्रिकी विभागास आलेले 90 टक्के यश यामुळे धरणात धरणात सुमारे 86 टक्के पाणीसाठा झाला आहे. 

दरम्यान, धरणाच्या सर्व्हिस गेटच्या गळतीची, सांडवा गेट व पाणीसाठ्याची पाटबंधारे विभागाच्या जिल्हा कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी पाहणी केली व पाणीसाठ्याबाबत समाधान व्यक्त केले.
चिकोत्रा खोर्‍याला वरदायी ठरणारा सुमारे दीड टीएमसी क्षमतेच्या धरणात परिसरातील वाया जाणारे पाणी धरणामध्ये वळवून आणण्यासाठी स्थानिक प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू होते. धरणामध्ये साठलेले पाणी धरणाच्या सर्व्हिस गेटलाच मोठ्या प्रमाणात लागलेल्या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात होते. गेली दोन वर्षांपासून ही गळती काढण्यास पाटबंधारे विभागास अपयश येत होते. त्याचा पावसाळ्यात धरणाच्या साठवणूकीवर परिणाम होत असेे. 

धरणाच्या सर्व्हिस गेटला असलेली गळती थांबविण्यासाठी संबंधित पाटबंधारे विभागाने तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे भुदरगड उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी दिला होता. शिवसेना आ. प्रकाश आबिटकर यांनी याची गंभीर दखल घेऊन धरणाच्या सर्व्हिस गेटची पाहणी केली व धरणस्थळावर बैठक घेऊन ही गळती तातडीने काढण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी पुणे येथील मेकॅनिकल विभागाच्या अभियंता टीमने गळती काढण्याचा प्रयत्न केला; पण धरणात पाणीसाठा जास्त प्रमाणात असल्याने ही गळती काढण्यात यश आले नाही. यावर्षीही शिवसेना व किसान सभेने सर्व्हिस गेटच्या गळतीबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने पाटबंधारे विभागाने गळतीचा विषय गंभीरतेने घेतला. त्यामुळे गळती काढण्यासाठी पुन्हा या जून महिन्यात  सदर कामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. 

धरणास भेट देऊन या पाणीसाठ्याची व सर्व्हिस गेटच्या गळतीची तसेच धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर पडणार्‍या सांडवा गेटची पाटबंधारे विभागाच्या जिल्हा अभियंता स्मिता माने यांनी पाहणी केली. यावेळी  शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अशोकराव पाटील, गारगोटी पाटबंधारे विभागाच्या अभियंता भाग्यश्री पाटील-परब, चिकोत्राचे शाखा अभियंता उत्तम कापसे, शशिकांत सावंत, स्वनिल पत्की आदी  उपस्थित होते.