Wed, Apr 24, 2019 11:29होमपेज › Kolhapur › पोलिसांकडून झाडाझडती!

पोलिसांकडून झाडाझडती!

Published On: Apr 08 2018 2:02AM | Last Updated: Apr 07 2018 11:46PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात घेणार्‍या परीक्षेसाठी बसणार्‍या उमेदवारांची पोलिसांकडून तपासणी होणार आहे. तपासणीनंतर या उमेदवारांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांवर नियुक्‍तीसाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत डमी विद्यार्थी बसवण्यात आल्याचे तसेच गैरप्रकार होत असल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर या परीक्षा अधिक शिस्तबद्ध व्हाव्यात, त्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याकरिता आयोगाने कडक पावले उचलली आहेत.परीक्षेसाठी परीक्षा केंद्रात जाणार्‍या उमेदवाराला केवळ पेन, पेन्सिल, ओळखीचा मूळ पुरावा आणि ओळखपत्र इतकेच साहित्य सोबत न्यावे लागणार आहे. अन्य कोणत्याही प्रकारचे साहित्य परीक्षा केंद्रावर नेता येणार नाही. असे साहित्य कोणीही नेऊ नये याकरिता केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांकरवी उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे. याकरिता पुरुष उमेदवारांसाठी 3 पुरुष व महिला उमेदवारांसाठी 2 महिला पोलिस कर्मचारी प्रत्येक उपकेंद्रांवर नेमण्यात यावेत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिस उमेदवारांची झडती योग्य प्रकारे घेतात की नाही याची खातरजमा केंद्रप्रमुखाला करावी लागणार आहे. जे उमेदवार कर्णबधीर आहेत, त्यांनी त्याकरिता इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवले आहे, अशा उमेदवारांचीही तपासणी केली जाणार आहे. मात्र, ती करता काळजीपूर्वक व सौजन्याने करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. बंदी घालण्यात आलेले साहित्य उमेदवाराकडे परीक्षा केंद्रांत आढळून आल्यास संबंधित उमेदवारांवर तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Tags : Kolhapur, checking, police