Thu, Jul 18, 2019 12:39होमपेज › Kolhapur › ८७,५२८ अर्जांत त्रुटी

८७,५२८ अर्जांत त्रुटी

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील घोळ अद्यापही संपण्याच्या मार्गावर नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील ऑनलाईन सादर केलेल्या 87,528 अर्जांमध्ये त्रुटी असल्याची यादी रविवारी रात्री राज्य सरकारच्या आयटी विभागाने सहकार विभागाकडे पाठवली आहे. सहकार विभागाने ही यादी तालुकास्तरीय समितीकडे पडताळणीसाठी दिली आहे. यापूर्वीची 57,020 लाभार्थ्यांच्या यादीची पडताळणी अद्याप संपलेली नसतानाच आता नव्याने ही यादी आल्याने सहकार खात्याची यंत्रणा वैतागून गेली आहे. 

राज्य सरकारने जून 2017 मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यापासून या योजनेतील गोंधळ काही संपलेला नाही. कालमर्यादेबाहेरील कर्जमाफीचे अर्ज, अनेक खातेदारांच्या नावावर एकच आधार क्रमांक, नावातील त्रुटी, चुकीचा खाते नंबरआदींमुळे लाभार्थ्यांना कर्जमाफी रकमेपासून वंचित रहावे लागले आहे. एका यादीत तर चक्‍क आमदार प्रकाश आबिटकर यांच्याच नावाचा समावेश करण्यात आला. यावर आ. आबिटकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान यादीतील घोळ पुढे आणला. 

आ. आबिटकरांचे नाव यादीत आल्याने शासनाने जिल्ह्यातील एक लाख 32 हजार लाभार्थ्यांची यादी परत घेतली होती. यापैकी 57 हजार लाभार्थ्यांची यादी सहकार विभागाकडे त्रुटी दूर करण्यासाठी पाठवली आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे व राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेमध्ये तालुका सहायक निबंधक, बँक निरीक्षक व तालुका लेखापरीक्षक यांच्याकडून यादी तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच आता नव्याने 87 हजार लाभार्थ्यांची यादी सहकार विभागाकडे त्रुटी दूर करण्यासाठी पाठवण्यात आली आहे. जिल्ह्यातील दोन लाख 56 हजार खातेदारांची सुमारे चार लाख कर्जखाती अपलोड करण्यात आली होती. 
यापैकी 76 हजार लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना लाभ मिळणार कधी, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.