Tue, Apr 23, 2019 09:50होमपेज › Kolhapur › बलात्कारप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा

बलात्कारप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:32AMगडहिंग्लज : प्रतिनिधी

येथील कासार गल्लीमध्ये राहणार्‍या व पतीपासून विभक्‍त असलेल्या एका महिलेला लग्‍नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याप्रकरणी संग्राम बाळासाहेब चव्हाण (रा. सरस्वती नगर, गडहिंग्लज) याच्याविरोधात पीडित महिलेने बलात्काराचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच यामध्ये संग्राम याला मदत करणारी त्याची पत्नी मीनाक्षी हिच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित महिला ही नवर्‍यापासून विभक्‍त राहत असून, 2008 साली तिला नोकरीची आवश्यकता असल्याने यामधून संग्राम याच्याशी तिची ओळख झाली होती. याच ओळखीतून दोघांमध्ये चांगले संबंध तयार झाले. 

संग्राम याने पीडितेला लग्‍नाचे आश्‍वासन देऊन तिची संमती नसताना तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. याशिवाय लग्‍न करून तिच्या मुलाला वारस ठेवतो, असेही सांगितले होते. पीडित महिलेला संग्राम याच्यापासून दिवस गेल्यानंतर तिला धमकावून दोन वेळा दवाखान्यात नेऊन गर्भपात केला. याशिवाय पीडितेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा पुन्हा शरीरसंबंध ठेवले. या सगळ्यामध्ये संग्राम याची पत्नी मीनाक्षी हिनेही मदत केली असून, पीडित महिलेने त्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुरणे करीत आहेत.