Wed, Nov 13, 2019 12:29होमपेज › Kolhapur › निलंबित पोलिस उपअधीक्षक शिंदेसह पत्नीवर गुन्हा

निलंबित पोलिस उपअधीक्षक शिंदेसह पत्नीवर गुन्हा

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलाला कायदेशीर दत्तक न घेता घरकामासाठी त्याचा वापर करून शारीरिक व मानसिक अत्याचारास कारणीभूत ठरल्याप्रकरणी निलंबित पोलिस उपअधीक्षक मधुकर धोंडिराम शिंदे (वय 55), पत्नी भारती शिंदे (50, रा. ताराबाई पार्क) यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. सर्वांगावर चटके देऊन कोवळ्या मुलाचा अमानुष छळ करणार्‍या निलंबित अधिकार्‍याच्या अल्पवयीन मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिने या मुलाचा लैंगिक छळ केल्याचाही आरोप आहे.

कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या घटनेची राज्य मानवी आयोग, महिला बालकल्याण केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडून आढावा घेतल्याने तपास यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे.

अल्पवयीन मुलीसह तिचे वडील मधुकर, आई भारतीविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता 326, 504, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 7 सह 8, बाल न्याय अधिनियम कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपासाधिकारी तथा शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. संशयितांवरील गुन्हा सिद्ध झाल्यास किमान दहा वर्षे सक्‍तमजुरीसह जबर दंडाची तरतूद असल्याचेही ते म्हणाले.

शिंदे दाम्पत्याला अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. नातेवाईक, मित्रमंडळींच्या घराची झडती घेण्यात आली आहे. संशयितांना लवकर अटक होईल, असे ते म्हणाले. सायंकाळी अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

कनाननगर येथील एका गरीब कुटुंबातील 11 वर्षांच्या मुलाला शिंदे दाम्पत्याने 2011 मध्ये पालन पोषणासाठी घेतले. काहीकाळ त्यांनी मुलाचा योग्य सांभाळही केला. त्यानंतर मात्र कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण न करता त्याचा घरगडी म्हणून वापर सुरू झाला. शिंदेंच्या अल्पवयीन मुलीने सन 2012 ते 1 डिसेंबर 2018 या कालावधीत मुलावर शारीरिक, मानसिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे.

संशयित मुलीने अल्पवयीन मुलाला जिन्यावरून ढकलून, भिंतीवर डोके आपटून, शरीरावर ठिकठिकाणी चटके दिले आहेत. मुलाला बंद खोलीत कोंडून घालून शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याचे महिला व बालकल्याण समितीच्या अधीक्षिका अश्‍विनी गुजर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अमानुष अत्याचारप्रकरणी निलंबित पोलिस उपअधीक्षक, पत्नी व मुलीविरुद्ध तक्रार दाखल होऊनही  पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने शहरात तीव्र पडसाद उमटू लागले होते. अत्याचाराला कारणीभूत ठरलेली अल्पवयीन मुलगी नातेवाईकांच्या घरात आश्रयाला असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मोरे, सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती देशमुख यांनी दुपारी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात येत होती. मात्र, तपशिलाबाबत तपासाधिकार्‍यांनी मौन पाळले आहे. निलंबित पोलिस अधिकारी व त्याच्या पत्नीला अटक केल्यानंतर या प्रकरणातील गूढ उकलेल, असेही सांगण्यात आले.

वडापवाला ‘मांत्रिक’ गायब
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित हे वडाप करणार्‍या एका मांत्रिकाच्या संपर्कात असल्याची माहिती तपास पथकातील अधिकार्‍यांना उपलब्ध झाली आहे. चौकशीसाठी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापि तो चार-पाच दिवसांपासून गायब झाला आहे. त्याचीही चौकशी करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.