होमपेज › Kolhapur › महाराष्ट्र खड्डेमुक्‍त होणारच

महाराष्ट्र खड्डेमुक्‍त होणारच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये हायकॉलिटीचे रस्ते न झाल्याने रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात, शासनाने रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून तीन हजार कोटींपासून सात हजार कोटींपर्यंतचा निधी वाढवत नेला आहे. पुढील दोन वर्षांत राज्यात 40 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतील आणि त्यात चौपदरी, तीन पदरी व दुपरी मार्गांचा समावेश असेल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील आढावा बैठकीत ते बोलत होते. 

महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत 22 हजार किलोमीटरचे चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकामकडील 10 हजार किलोमीटरचे तीन पदरी रस्ते आणि भारतमालामधून 6 हजार 500 किलोमीटरचे सहापदरी रस्त्यांची कामे होणार आहेत. वाढत्या वाहतुकीचा भार पेलू शकेल, रस्त्यावरील अवजड वाहतूक, गौण खनिज वाहतूक यांनाही पेलू शकेल, असे रस्ते महाराष्ट्रात यापूर्वी झाले नाहीत. येत्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात दर्जेदार रस्ते करुन महाराष्ट्र रस्त्यांच्या दृष्टीने चकचकीत होईल. राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात आले असून 15 डिसेंबरपर्यंत ते पुर्ण होईल. त्यासाठी 34 जिल्ह्यांचा दौरा सुरु असून कोल्हापूरसह 25 जिल्ह्यांचा दौरा पुर्ण झाला आहे.

उर्वरित जिल्ह्यांचा दौराही 6 डिसेंबरपुर्वी पुर्ण करणार असून त्यातूनच अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामाचा लेखाजोखा होणार आहे. गेल्या तीन वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन हजार लोकांना पदोन्नती दिली आहे. नजिकच्या काळत आणखी 100 लोकांना देण्यात येणार आहे. पण 200 जणांना निलंबित ही करण्यात आले आहे. त्यामुळे जो चांगले काम करील त्यांला प्रोत्साहन व गैर प्रकार करणार्‍यांना शिक्षा या न्यायाने हा विभाग काम करीत आहे.यावेळी अवर सचिव आर. डी. जोशी, मुख्य अभियंता पी. एम. पिडे, अधिक्षक अभियंता एस. एस. साळुंखेंसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.