होमपेज › Kolhapur › पालकमंत्री पाटील यांच्या रुद्रावताराने विरोधकांना धास्ती!

पालकमंत्री पाटील यांच्या रुद्रावताराने विरोधकांना धास्ती!

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शांत, संयमी आणि विचार करूनच बोलणारे सौजन्यमूर्ती म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रसिद्ध असलेले महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत रुद्रावताराचे दर्शन घडविले. झोपलेल्या राक्षसाला उठवले आहात, आता तुम्हाला महागात पडेल, असा खणखणीत इशारा त्यांनी आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता दिला. एका थोबाडीत मारल्यास दुसरे थोबाड पुढे करणारा मी नसून, विरोधकांनी महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या सर्व भानगडी बाहेर काढणार, अशी सिंहगर्जनाही त्यांनी केली. त्यांच्या या रुद्रावताराची चर्चा होत आहे. पालकमंत्र्यांच्या अत्यंत आक्रमक व अनपेक्षित पवित्र्याने नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर राजकारण ढवळले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंगीवर पाय पडला तर तीसुद्धा चावते. आता मी स्वस्थ बसणार नाही. भाजपचा मी ज्येष्ठ नेता आहे. माझे पदच इतके मोठे आहे की, राज्यातील कोणत्याही विषयावर बैठक असेल, तर प्रोटोकॉलप्रमाणे मला तेथे उपस्थित राहावेच लागले. कोणत्याही मंत्रालयाची किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याबाबतची बैठक असेल, तरी तेथे मला जावेच लागते. त्यामुळे एखाद्या किरकोळ विषयाबाबत आपल्या उपस्थितीचे भांडवल विरोधकांनी करू नये, अशा शब्दांत ना. पाटील यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि शहराचा विकास करण्यासाठी विरोधक महापालिकेत जात नाहीत, तर आरक्षणे उठवून तेथे टोलेजंग इमारती बांधून पैसा मिळविणे हा त्यांच्या हेतू असल्याचे उघड झाल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. विरोधकांच्या या आतापर्यंतच्या सर्व भानगडी आपण बाहेर काढणार आहोत. वीस वर्षांत महापालिकेने कोणती आरक्षणे उठविली आणि शाळा पाडून कोठे इमारती बांधल्या. त्याचबरोबर ऐतिहासिक तळे नष्ट करून कोणी हॉटेल बांधले, जयप्रभा आणि शालिनी सिनेटोनमध्ये कोणी पार्क उभे केले. याचा भांडाफोड केला जाईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या इशार्‍याने येत्या काही काळात पडद्याआडच्या अनेक गोष्टी चव्हाट्यावर येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यातून नजीकच्या काळात कोल्हापूरच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटण्याची शक्यता आहे.

राक्षस उठला आहे!
माझ्या गुरूने मला सांगितले होते की, राक्षस झोपला असेल तर त्याला उठवू नये, त्याला झोपू द्यावे. आता मात्र राक्षस उठला आहे. हा राक्षस कोणते रूप धारण करतो ते विधान परिषदेने आणि मुंबईनेही अनुभवले आहे. विधान परिषदेत नको त्या विषयावर टीका होऊ लागताच आपण एका आमदाराला चोख उत्तर दिले होते. भाजपच्या मुंबई महामेळाव्यातही आपण जोरदार आणि कणखर भाषण केले, असे सांगत यावेळी पालकमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. छगन भुजबळ यांच्याशेजारी आणखी कोठड्या शिल्लक असल्याची आठवणही चंद्रकांत पाटील यांनी भाजप मेळाव्यात करून दिली होती. त्यांच्या या रुद्रावताराने यापुढील काळात ते विरोधकांच्या मागे हात धुऊन लागण्याची चिन्हे आहेत. 

जेव्हा एखादी गोष्ट जास्तवेळ  साचली जाते किंवा ताणली जाते तेव्हा त्याचा शेवट स्फोटात किंवा तुटण्यात होतो. तोच अनुभव आता आपल्या वागण्यातून येत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. ऊठसूट कोणीही आरोप केले, तर आता खपवून घेणार नाही. आरोप करणार्‍यांना न्यायालयात खेचू, असा इशाराही पाटील यांनी दिला असल्याने ते विरोधकांमागे न्यायालयाचे शुक्लकाष्ठ लावणार, हे स्पष्टच आहे.

ओमर अब्दुला यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने आता 2024 च्या निवडणुकीचीच तयारी करावी, असे पाटील यांनी सूचित केले. गेल्या चार वर्षांत भाजपने दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. केंद्र, राज्याबरोबरच महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतपर्यंत भाजप पोहोचले आहे, अशा शब्दांत काँग्रेस आणि इतरांची खिल्ली उडवीत पालकमंत्र्यांनी शत-प्रतिशत भाजपच, असा आत्मविश्‍वास प्रकट केल्याचेही राजकीय जाणकारांचे मत आहे. 

एकूण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा रुद्रावतार आणि कमालीचा आक्रमक बाणा प्रथमच समोर आल्याने सर्वसामान्यांत त्याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या या आक्रमक बाण्यावर कॉमेंटस् येत आहेत.  पालकमंत्री आता यापुढे कोणते पाऊल उचलतात, विरोधकांवर कशी कुरघोडी करतात, त्यांची अंडीपिल्ली कशी बाहेर काढतात, याविषयी लोकांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसत आहे.