Fri, Jul 19, 2019 07:40होमपेज › Kolhapur › पालकमंत्र्यांकडून दादागिरीची भाषा

पालकमंत्र्यांकडून दादागिरीची भाषा

Published On: Apr 15 2018 1:33AM | Last Updated: Apr 15 2018 1:33AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दादागिरीची भाषा वापरली जात आहे. त्यांच्या कालच्या वक्तव्यावरून शिरोलीचे वारे लागले आहे, अशी टीका महापौर सौ. स्वाती यवलुजे यांच्यासह महापालिका पदाधिकार्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. काही मंडळी पालकमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतः स्वच्छ असल्याचे दाखवत आहेत, असेही त्यात म्हटले आहे.

पालकमंत्र्यांनी महापौरांना चिल्ली-पिल्ली असे म्हणणे हा कोल्हापूरकरांचा अवमान आहे. त्याबद्दल महापालिकेचे पदाधिकारी पालकमंत्र्यांचा निषेध करत आहोत. महिला महापौर असताना पालकमंत्र्यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. तसेच राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांना स्वतः मी वजनदार मंत्री आहे, बलाढ्य नेता आहे, असे सांगावे लागणे म्हणजे दुर्दैव आहे. जनतेने मान्य केलेले नसल्यानेच त्यांना असे सांगावे लागत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

पालकमंत्र्यांची स्वतःलाच राक्षसाची उपमा...

पत्रकात म्हटले आहे की, महापौर, पदाधिकारी, माजी महापौर, पक्षांचे पदाधिकारी व राष्ट्रीय सरचिटणीस हे जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. पालकमंत्र्यांच्या दृष्टीने हे सर्व चिल्ली-पिल्ली असले तरी आम्हा सर्वांसाठी ते पालकमंत्री हे पालकच आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा मान राखून स्वतःला राक्षसाची उपमा देणे संयुक्तिक वाटत नाही. तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमणप्रकरणी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत महापालिका अधिकार्‍यांना तोंडी आदेश दिले. त्यानंतर महापालिकेच्या स्वायत्ततेच्या दृष्टीने काही शंका उपस्थित केल्या, तर त्याचा एवढा राग येण्याचे कारण काय? मूळ मुद्द्याला बगल देऊन जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न पालकमंत्री पाटील यांच्याकडून होत आहे.

मग महापालिकेला कारवाईचे आदेश द्या...

2010 पासून महापालिकेत पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून शहराचा विकास करताना आघाडीच्या दोन्ही नेत्यांनी जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनानुसार एकही आरक्षण उठवलेले नाही. तरीही पालकमंत्री पाटील यांनी गेल्या वीस वर्षांतील आरक्षण उठविण्याच्या कारभाराची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. पाटील यांनी चौकशी करावी म्हणजे त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांचे कर्तृत्व जनतेसमोर येईल. पालकमंत्री पाटील यांच्याकडून पदाच्या माध्यमातून दादागिरीची भाषा वापरली जात आहे. तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणाशी काहीही संबंध नाही, असे सांगणार्‍या पालकमंत्री पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याबाबत महापालिकेला आदेश द्यावेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

पत्रकावर उपमहापौर सुनील पाटील, सभागृह नेता दिलीप पोवार, शिक्षण समिती सभापती वनिता देठे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी महापौर आर. के. पोवार आदींच्या सह्या आहेत.