Thu, Jul 18, 2019 16:56होमपेज › Kolhapur › शिवरायांचे आदर्श आत्मसात करा : पाटील

शिवरायांचे आदर्श आत्मसात करा : पाटील

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:24AMपन्हाळा : प्रतिनिधी 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी चारित्र्य व शौर्य अखंड जपले होते. आजच्या पिढीने नुसती पदभ्रमंती न करता छत्रपती शिवरायांचे आदर्श आत्मसात करावेत. या पद मोहिमेतून प्रत्येकास निश्‍चित एक नवी ऊर्जा मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पन्हाळा येथे केले. हिल रायडर्स व हायकर्सच्या पहिल्या टप्प्यातील पदभ्रमंती मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी  पालकमंत्री पाटील बोलत होते.   

हिल रायडर्स व हायकर्स असोसिएशनतर्फे ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या 51 व्या पदभ्रमंती  मोहिमेस शनिवारी सुरुवात झाली. प्रथम नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी नगराध्यक्षा रूपाली धडेल, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली आदी ठिकाणाहून सुमारे एक हजार शिवभक्त मावळे  पदभ्रमंतीस सहभागी झाले. मोहीम प्रारंभ करताना मर्दानी खेळ प्रशिक्षक सूरज ढोली यांनी शिव प्रार्थना केली.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही मोहीम राजदिंडीमार्गे मसाई पठार-खोतवाडी-मांडलाईवाडी-करपेवाडी-आंबर्डे तर्फ आंबवडे मार्गे रिंगेवाडी-कळकेवाडी-मळेवाडी-पाटेवाडी-सुकाम्याचा धनगरवाडा-म्हसवडे वाडा-पांढरे पाणी ते पावनखिंड येथे पोहोचणार आहे. स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले.

गेली 33 वर्षे सातत्याने पन्हाळा-पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम सातत्याने सुरू आहे. यातील सहभागी होणार्‍यांची संख्याही विक्रमी आहे.  यंदा गिनिज बुकात नोंद होण्यासाठी हिल रायडर्सतर्फे प्रयत्न सुुरू आहेत. याकरिता डिसेंबर 2018 मध्ये विशेष मोहीम आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे विनोद कांबोज यांनी दिली.