होमपेज › Kolhapur › ‘लँड टायटल’ बिल आणणार

‘लँड टायटल’ बिल आणणार

Published On: Feb 02 2019 1:28AM | Last Updated: Feb 02 2019 12:57AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

प्रॉपर्टीच्या सर्व नोंदींबरोबर मालकी हक्‍क देणारे ‘लँड टायटल’ बिल आणणार असल्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. भूमिअभिलेख विभागाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

 या क्रीडा स्पर्धेसाठी एक कोटीची तरतूद केली जाईल, अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर झालेल्या या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय नेमबाज, सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, राज्याचे जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम प्रमुख उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, राज्यातील 40 हजार गावांतील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या साहाय्याने केले जाणार आहे. यानंतर या लोकांना प्रॉपर्टी कार्डाद्वारे मालकी हक्‍क देण्यात येणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाने गावठाणांची मोजणी अधिक सोपी आणि अचूक होईल. यापुढील काळात लँड टायटल बिल आणून लोकांना मालकी हक्‍क देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हा उपक्रम देशातील एक अभिनव उपक्रम ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

अधिकारी-कर्मचार्‍यांनी महसूल गोळा करण्याबरोबरच लोकांना समाधान कसे मिळेल, या दृष्टीनेही आपल्या कामकाजात सुधारणा कराव्यात, असे सांगत पाटील म्हणाले, महसूलमधील जाचक जुन्या कायद्यांमध्ये सुधारणा केल्या जातील. लोकांना जाचक ठरणार्‍या कायद्यांमध्ये निश्‍चितपणे बदल करण्याची भूमिका शासनाने स्वीकारली आहे. येत्या वर्षभरात महसूल विभागाचा राज्यभर दौरा करून महसूल विभागातील अडचणी, समस्या जाणून घेऊन त्या दृष्टीने या विभागात निश्‍चितपणे बदल केले जातील. शासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शी करताना अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये आनंद, उत्साह आणि सांघिक भावना वृद्धिगंत व्हावी, यासाठी या विभागात क्रीडा स्पर्धा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम याप्रसंगी बोलताना म्हणाले, भूमिअभिलेख विभागामध्ये काळानुरूप बदल आणि सुधारणा होत असून, नव्या तंत्रज्ञानाद्वारे मोजणीचे काम केले जात आहे. यापुढील काळात हे काम अधिक पारदर्शी, लोकाभिमूख आणि गतिमान करण्याचा प्रयत्न राहील. सावंत म्हणाल्या, खेळ हा जीवनातील महत्त्वाचा भाग असून, भूमिअभिलेख विभागाने 53 खेळांसाठी ही स्पर्धा आयोजित करून अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये खिलाडू वृत्ती जोपासण्याचा व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. जो खेळ खेळाल तो प्रामाणिकपणे खेळा व जिंकण्यापेक्षा आनंद मिळविण्यासाठी खेळा, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण झाले. यानंतर सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली. कोल्हापूरचे जिल्हा भूमिअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक वसंत निकम यांनी स्वागत केले. पुणे विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेत या विभागाच्या राज्यातील सुमारे 425 खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमास भूमिअभिलेख उपसंचालक सतीश भोसले, शाम खामकर, बाळासाहेब काळे, मिलिंद चव्हाण, संजय ढिकळे, राज्यपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव मोहिते, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी कांबळे, विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राम खिरेकर, कोकण प्रदेश अध्यक्ष रमेश सरकटे, शहर नगरभूमापन अधिकारी किरण माने यांच्यासह भूमिअभिलेख विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते..