Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Kolhapur › भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणार्‍या नेत्याकडे एवढे साम्राज्य कुठून आले?

भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणार्‍या नेत्याकडे एवढे साम्राज्य कुठून आले?

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 12:28AMआजरा : प्रतिनिधी

सयाजी हॉटेल, वॉटर पार्क, हॉस्पिटल यांच्या जमिनी कुठून आल्या? त्यांच्याकडे एवढे साम्राज्य कुठून आले? या सर्वांची माहिती आपणाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठे बोलण्यापेक्षा कामातून आपले कर्तृत्व दाखवावे, असा उपरोधिक टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. सतेज पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

आजरा येथे शहर विकास आघाडीच्या वतीने आयोजित विजयी मेळाव्यात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक होते. यावेळी आ. हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली .

ना. पाटील म्हणाले, आजरा शहरवासीयांनी मोठ्या विश्‍वासाने अशोक चराटी व त्यांच्या सहकार्‍यांकडे नगरपंचायतीची सत्ता सोपवली आहे. 

नगरपंचायतीसाठी लागेल ते सहकार्य करण्याची आपली तयारी आहे. या निवडणुकीत आपण प्रचारात कुठे आलो नाही, अशी चर्चा होती. परंतु, जेथे स्थानिक मंडळी सक्षम आहेत, तिथे आपण जाण्याची गरजच नाही. शहरातील पाणी, कचरा, रस्तेप्रश्‍नी आपण सर्वतोपरी मदत करू. 2019 साली होणार्‍या निवडणुकीत विरोधकांनी वेळ व पैसा वाया घालवू नये. येत्या वर्षभरामध्ये जिल्ह्यातील सात रखडलेले पाणी प्रकल्प मार्गी लावण्यास आपण बांधील आहोत.

महादेवराव महाडिक म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व आ. सुरेशराव हाळवणकर यांनी आजरा नगरपंचायतीमध्ये जिल्ह्याचे नेते मानणार्‍या पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करून इतरांवर टीका करावी. राजकारणाचे बावन्‍न पत्ते आपल्याकडे आहेत. दोन गुलामही आपल्याकडे आहेत.

आ. हाळवणकर म्हणाले 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे तीन-तेरा करणारे नेते आता उदयास येऊ लागलेले आहेत. अशोक चराटी हे त्यापैकीच एक आहेत. आजरा शहराच्या विकासासाठी आपण  बांधील आहोत. 55 कोटी रुपयांच्या विकास कामांचे प्रश्‍न मार्गी लावण्याकरिता आपण सर्व ते सहकार्य आजरावासीयांना करू. पहिली नगरपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा असतानाही सत्तेसाठी तडफडणार्‍या मंडळींनी निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला; पण हा प्रयत्न आजरा शहरवासीयांनी हाणून पाडला. आजरेकरांचे हे उपकार कदापिही विसरणार नाही.   

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष व आघाडी प्रमुख अशोक चराटी यांनी आजरा शहराकरिता नवीन पाणीपुरवठा योजनेसह तालुक्यातील प्रलंबित पाणीप्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली. 

यावेळी नूतन नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्यासह नूतन नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, आलम नाईकवाडे, भाजप तालुकाध्यक्ष अरुण देसाई, अनिल देशपांडे, जि. प. सदस्या सुनीता रेडेकर, रमेश रेडेकर, आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्‍नपूर्णादेवी  चराटी आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक विजयकुमार पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले. आभार डॉ. अनिल देशपांडे यांनी मानले.