Wed, Apr 24, 2019 15:48होमपेज › Kolhapur › चंदगड नगरपंचायत शंभर टक्के होणार 

चंदगड नगरपंचायत शंभर टक्के होणार 

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 11:14PMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा 28 मार्चनंतर शंभर टक्के दिला जाईल, असे आश्‍वासन महसूल व पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते चंदगड येथील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी व सुवर्णजयंती महाराजस्व अभियानांतर्गत महासमाधान शिबिरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. संध्यादेवी कुपेकर होत्या.

प्रास्ताविक प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी केले. ना. पाटील म्हणाले, चंदगडच्या नगरपंचायतीसाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत. विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्यामुळे नगरपंचायतीची घोषणा करता येणार नाही. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर शंभर टक्के चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा दिला जाईल. राज्यातील एकही रस्ता दोन वर्षात खराब राहणार नाही. 57 हजार किलोमीटरच्या रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. काही रस्त्यांच्या अस्तरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामधील 90 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाले आहेत. तसेच राज्यातील 22 पिकांचे हमीभाव ठरवले आहेत. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन बांधील आहे. बर्‍याच योजना सामान्य जनतेला माहिती नाहीत. राज्याच्या इतक्या मोठ्या लोकसंख्येत केवळ 1 लाख 17 हजार नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. शासकीय योजनांची माहिती करून घेणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचेही  मंत्री पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आ. संध्यादेवी कुपेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, राजेश पाटील, जि.प. सदस्य कल्लाप्पा भोगण, सचिन बल्लाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केले. आभार तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी मानले.

घोषणांनी सभागृहात गोंधळ 
अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी चंदगड तालुक्यातील समस्यांचे गार्‍हाणे ना. चंद्रकांत पाटील यांच्या कानावर घालण्यासाठी आपण सभागृहात बोलणार असल्याचे पोलिसांना निवेदन दिले होते. ना. पाटील यांचे भाषण सुरू होताच अ‍ॅड. मळवीकर यांच्यासह 15 जणांनी बंद पडलेला दौलत साखर कारखाना, चंदगडची नगरपंचायत, पोलिसपाटील भरती प्रकरणाची चौकशी झालीच  पाहिजेत,  अशा घोषणा दिल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतले. 

नगरपंचायत कृती समितीकडून अ‍ॅड. मळवीकरांचा निषेध 

चंदगड येथील महसूल प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन समारंभापूर्वी चंदगड नगरपंचायत कृती समितीची ना. चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली. यावेळी मंत्री पाटील यांनी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. मात्र, ना. पाटील भाषण करताना कोणतीही भूमिका समजावून न घेता अ‍ॅड. संतोष मळवीकर यांनी नगरपंचायत घोषणेवरून सभेत गोंधळ घातल्याबद्दल चंदगडच्या ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. 
पत्रकार परिषदेत कृती समितीचे अध्यक्ष शिवानंद हुंबरवाडी, बाबुराव हळदणकर, चंद्रकांत दाणी, सुरेश सातवणेकर, अल्लीसोा मुल्ला यांनी  तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. यावेळी दिलीप सबनीस, सुनील काणेकर, दयानंद काणेकर, प्रवीण नेसरीकर, उमर पाटील आदी उपस्थित होते.