Tue, Jul 16, 2019 09:40होमपेज › Kolhapur › ...तर कोल्हापूर उत्तरमधून रिंगणात; चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

...तर कोल्हापूर उत्तरमधून रिंगणात; चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 04 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मी कोरे पाकीट आहे, या पाकिटावर पक्षाने माझ्या नावाचे लेबल लावल्यास, मला कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवावी लागेल, असे सूचक विधान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शहरात खूप मोठी लढाई लढायची आहे. म्हटले तर सोपी आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी गाफील राहता कामा नये, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयाकडे नेण्यासाठी बूथ प्रमुखांनी बूथ रचना भक्कम करावी, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या बूथ संपर्क महासंमेलनात ते बोलत होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजपने आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर आणि बूथ रचनेच्या सक्षमतेवर अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. कर्नाटकात 40 आमदारांवरून 104 आमदार निवडून आणले.  बूथ रचनेमुळे हे यश मिळाले आहे. जिल्ह्यात दोन्ही लोकसभा आणि दहा विधानसभा मतदार संघात भाजप ठरवेल तेच उमेदवार खासदार आणि आमदार होतील. जिल्ह्यात दहापैकी सात विधानसभा मतदार संघात बूथ कार्यकर्त्यांचे संमेलन झाले आहे. आज कोल्हापूर उत्तरमधील कार्यकर्त्यांचे संमेलन आहे. आठ जून रोजी इचलकरंजी आणि शिरोळ आणि नऊ किंवा अकरा जून रोजी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात कार्यक्रम होईल.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरमध्ये महेश जाधव 42 हजार आणि सत्यजित कदम यांनी 52 हजार मते घेतली आहेत. सेनेच्या आमदारांना 68 हजार मते मिळाली आहेत. दोघांची मते एकत्र केल्यास काय होऊ शकते, याचा अंदाज आला असून, आज दोघे एकत्र आहेत. महेश जाधव, सत्यजित कदम, सुनील कदम, मधुरिमाराजे, बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील, सुहास लटोरे ही नावे चर्चेत आहे. माझेही नाव चर्चेत येते.  मला यामध्ये रस नाही. मात्र, मी कोरे पाकीटअसून ते कोठेही जाऊ शकते. या पाकिटावर पक्षाने माझे नाव टाकल्यास मला निवडणूक लढवावी लागेल. उमेदवारी कोणाला द्यायची, हा निर्णय मात्र पक्षाचा असेल. बूथ प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क अभियान राबवावे. लोकांचे वाढदिवस, दहावी, बारावी विद्यार्थ्यांचे अभिनंंदन, दिलासा अशा माध्यमातून लोकांच्या संपर्कात रहा.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कॉलनीतील मंदिरात सामुदायिक आरती उपक्रम सुरू केला आहे. आठवड्यातून एका मंदिरात ही आरती केली जाते. या निमित्ताने कॉलनीची एकता साधता येते. लोकसंपर्क वाढविता येतो. वाढदिवसानिमित्त शहर आणि जिल्ह्यात महिला स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. यासाठी संवेदना ट्रस्टला मदत करावी. वाढदिवसास बुके, पुष्पहार न आणता संवेदना ट्रस्टला मदत करावी. महिला स्वच्छतागृहांसाठी शहरात 20 आणि जिल्ह्यात 28 ठिकाणे निश्‍चित केली आहेत. एक महिन्यात 53 लोकांना 58 लाख रुपयांची वैद्यकीय मदत केली आहे. आतापर्यंत 414 रुग्णांना पाच कोटी 95 लाख रुपयांची मदत केली आहे. साडेतीनशेहून अधिक लोकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली असून, 1840 लोकांना मोफत चष्मे प्रदान केले आहेत. यातून मत मिळो न मिळो, पुण्य मात्र नक्कीच मिळते.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘वन बूथ टेन यूथ’ या संकल्पनेनुसार काम सुरू आहे. भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत आहे.  मतदान यंत्रावरून आरोप केले जातात. मात्र, बूथ लेव्हलवर काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे हे यश असते, याचा विचार केला पाहिजे. पालकमंत्री पाटील यांनी शहरात चार हजार कोटींची कामे केली आहेत. त्यामुळे  500 कोटींचा निधी आणा, हत्तीवरून मिरवणूक काढू, म्हणणार्‍यांची तोंडे बंद झाली आहेत. भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी बूथ रचना अधिक सक्षम करावी, असे आवाहन जाधव यांनी केले.

आ. सुरेश हाळवणकर यांनी केंद्र व राज्य सरकारने समाजातील विविध घटकांसाठी राबविलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली. या योेजना सर्वसामान्यांना माहीत असतात असे नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सर्व योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे. योजना पोहोचल्या की, सरकारने केलेले काम जनतेपर्यंत जाऊ शकते, त्याचा निवडणुकीत चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे जनतेपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आ. हाळवणकर यांनी केले. महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वागत केले. व्यासपीठावर भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, ताराराणी आघाडीचे गटनेता सत्यजित कदम, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, स्थायी सभापती आशिष ढवळे, सुहास लटोरे, अ‍ॅड. संपतराव पवार-पाटील, संतोष भिवटे, विजय जाधव, अशोक देसाई, नगरसेविका सौ. जयश्री जाधव, सौ. वैशाली पसारे  उपस्थित होत्या.