Tue, Mar 19, 2019 03:24होमपेज › Kolhapur › लोकाभिमुख कामे हाच आपला पिंड : ना. पाटील

लोकाभिमुख कामे हाच आपला पिंड : ना. पाटील

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:08AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

लोकाभिमुख कामे हाच आपला पिंड असून, तळागाळातील आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी सतत धडपड सुरूच राहणार असल्याचे राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच्या आपल्या वाढदिवसानिमित्त ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. वाढदिवसाचा डामडौल न करता सामाजिक उपक्रम आणि समाजसेवेतून तो साजरा करण्याचा आपला नेहमीच आग्रह राहिला आणि त्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला, असेही त्यांनी सांगितले.

मागील वर्षी शेतकर्‍यांसाठी बी-बियाणे, खत दिले. यावेळी ‘महिलांना आरोग्यदायी भेट...स्वच्छतागृहांची’, अशी साद घालत चंद्रकांतदादा पाटील वाढदिवस सत्कार समितीने जनसुविधा केंद्र उपक्रम हाती घेतला आहे. संवेदना सोशल फौंडेशनमार्फत जिल्हाभर हा उपक्रम राबविला जात आहे. याचीच दखल घेत थेट राज्य सरकारनेही हा उपक्रम राज्यभरातील रस्त्यांवर राबविण्यासाठी खास निर्णय घेतला आहे. ना. पाटील यांचा रविवारी (दि. 10) वाढदिवस साजरा होत आहे. तो पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि मोठमोठे फ्लेक्स अशा स्वरूपाचा न करता सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वाढदिवस हा कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर साजरा करायचा असतो; पण त्यातही समाजाच्या भल्यासाठी काय करता येईल, हे शोधायला हवे, असे ना. पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, राजकीय कारकीर्दीत आपण कधीच स्वप्रसिद्धीसाठी खटाटोप केला नाही. वाढदिवसाचे भले मोठे बॅनर लावून शहर, गाव आणि रस्ते विद्रूप करण्यापेक्षा तोच पैसा सामाजिक सोयी-सुविधांसाठी वापरला जावा, हा माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा नेहमीच आग्रह राहिला. याच खर्चात समाजोपयोगी काम झाल्यास सर्वसामान्यांना आनंद मिळतो. तो आपल्यापर्यंत पोहोचतो. यातूनच समाधान लाभते.

आपण जेव्हा एखाद्या गावातील बाजारपेठेत अथवा जिल्हा आणि राज्य मार्गाने जातो, तेव्हा तेथे विशेषतः महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले. मंत्री या नात्याने जेव्हा राज्यभर फिरतो, तेव्हा हा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवला. तो काही कार्यकर्त्यांना बोलून दाखविला आणि पुढे कल्पना आली ती म्हणजे, महिलांना आरोग्यदायी भेट. या कल्पनेतूनच जनसुविधा केंद्रांचा आराखडा तयार झाला. ती बांधण्यासाठी जागा शोधल्या गेल्या. त्याची स्वच्छता आणि डागडुजी राखणार्‍यांना जवळच दुकानगाळाही बांधून देण्याचा निर्णय झाला. अशाप्रकारे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न मार्गी लागत असतानाच बचत गट अथवा एखाद्या कुटुंबाला रोजगारही मिळाला. समाजोपयोगी कल्पनांना बळ मिळाल्यास चांगले उपक्रम पुढे येतील, असा दावा पाटील यांनी केला.