Thu, Jun 20, 2019 06:35होमपेज › Kolhapur › दोन्ही काँग्रेसने राजकारण बंद करावे : पालकमंत्री

दोन्ही काँग्रेसने राजकारण बंद करावे : पालकमंत्री

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 11:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पश्‍चिम महाराष्ट्र हा कुणाची जहागिरी नाही, हाच संदेश सांगली महापालिकेच्या निवडणुकीने दिला असून, जळगावचा निकाल पाहता दोन्ही काँगे्रसने आता राजकारणच बंद करावे, असा टोला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 

महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मुलांसाठी बांधलेल्या पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 
सांगली व जळगाव  मनपा निकालाविषयी बोलताना ते म्हणाले, काँगे्रस, राष्ट्रवादीचे लोक हे अलीकडे भाजपची हवा गेली, असे सांगत सुटले होते; पण पश्‍चिम महाराष्ट्र हा कुणाची जहागिरी नाही,
 हे सांगलीच्या निकालाने दाखवून दिले, तर जळगावमध्ये भाजपला मिळालेले यश पाहता, दोन्ही काँगे्रसने राजकारणच सोडून द्यावे. 

सांगलीच्या जनतेचे आभार मानून पाटील म्हणाले, आम्हीच लोकांची कामे करू शकतो, हा विश्‍वास गेल्या चार वर्षांत सरकारने निर्माण केला आहे. आमच्याकडूनही काही कामे अपुरी आहेत; पण तीही आम्हीच पूर्ण करणार, असाही विश्‍वास जनतेला आहे. भाजप सरकारविरोधात माध्यमांवर उलटसुलट भाकीत केले गेले. लोक भाजपवर नाराज असल्याचे वृत्त पसरवण्यात आले; पण निकाल बघितला तर दोन्हीकडे काठावरचे नव्हे, तर घवघवीत यश मिळाले आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात ज्या-ज्या निवडणुका झाल्या, त्यात नांदेड महापालिका वगळता सर्वत्र भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. कोल्हापूर महापालिकेत आम्ही कमी पडलो; पण तरीही या ठिकाणी आमचे 33 सदस्य आहेत, बहुमतासाठी दोनची गरज होती; पण शिवसेनेच्या भूमिकेमुळे ते शक्य झाले नाही. कोल्हापूर, सांगली जिल्हा परिषद भाजपने विरोधकांकडून हिसकावून घेतल्या. या दोन्ही जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समितीतही भाजपला चांगले यश मिळाले. हे सर्व पाहता लोक भाजपवर खूश आहेत, सांगलीच्या निकालावरून ते पुन्हा सिद्ध झाले आहे, एवढे नक्की.

इतरांना आंदोलनातील नेत्यांनीच एकत्र आणावे
प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते म्हणतात आम्हाला विश्‍वासात घेतल्याशिवाय आंदोलन नाही. यामुळे काही ठिकाणी पडलेले गट एकत्र आणण्यासाठी काय करणार, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एकत्र आणण्याचा प्रयत्न आंदोलनातील नेत्यांनीच केला पाहिजे. राजकीय नेत्याने हा प्रयत्न केल्यावर त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. वारंवार मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन केले जात आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर एका महिन्याच्या आत आरक्षण देऊ. मात्र, अद्यापही आंदोलन थांबलेले नाही, याचा नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. हे सरकार पारदर्शी असून, जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. चर्चेसाठी पुढे येणार्‍या नेत्यांना फसवण्याचा संबंध येतो कुठे, त्यामुळे तहात हारण्याचा व फसविले जाण्याचा मुद्दाच येत नाही, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.