Sat, Aug 24, 2019 21:43होमपेज › Kolhapur › सतेज पाटील यांचे नगरसेवकांवर दबावतंत्र

सतेज पाटील यांचे नगरसेवकांवर दबावतंत्र

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:59AMपेठवडगाव : वार्ताहर 

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची धूळधाण झाली आहे. या पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. केवळ संपत्तीच्या जीवावर विधान परिषदेत आमदार झालेल्या सतेज पाटील यांनी महानगरपालिकेत नगरसेवकांना खुले सोडले असते तर भाजपचा महापौर झाला असता, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  केले. हातकणंगले तालुक्यातील भाजप बूथप्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

ना. पाटील म्हणाले, राजकीय समीकरणात काँग्रेसचे पानिपत झाले आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात त्यांचे स्थान नगण्य झाले. कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेतूनही  बाहेर पडेल आणि भाजपचा महापौर होईल, या भीतीने सतेज पाटील यांनी नगरसेवकांना अक्षरश: बंदी केले आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणून साम, दाम, दंड, भेद  नीतीचा वापर करीत आहेत. या प्रक्रियेत छुपी मदत करणार्‍या आमच्या भागीदाराने पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले, असा घणाघात त्यांनी शिवसेनेवर केला.

आ. सुरेश हाळवणकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा आढावा घेतला. या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या असल्याचा दावा करून त्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांनी घेतल्याचे सांगितले. भाजपच्या विजयाचा चौफेर वारू उधळत असून येणार्‍या निवडणुकीत भाजपचे आमदार, खासदार सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

 तालुका सरचिटणीस तानाजी ढाले यांनी स्वागत केले, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, संघटनमंत्री बाबा देसाई, जि.प. सदस्य अशोक माने यांची भाषणे झाली. पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, हुपरी नगराध्यक्षा जयश्री गाट, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, पेठवडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोकराव चौगुले, तालुकाध्यक्ष पी.डी.पाटील, उद्योजक आण्णासाहेब शेंडुरे, पं. स. सदस्या अंजना शिंदे, उद्योजक सतीश घाडगे हे उपस्थित होते. आभार तालुका सरचिटणीस नानासाहेब जाधव यांनी मानले.

नगराध्यक्षांच्या हजेरीने भुवया उंचावल्या
मेळाव्यास नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी हजेरी लावल्याने कार्यकर्ते अवाक् झाले. याचा खुलासा करताना आमदार हाळवणकर यांनी नगराध्यक्ष माळी यांची त्यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अशोकराव चौगुले यांच्याशी युती झाली असून, येणार्‍या निवडणुकीत भाजपचा झेंडा नक्की फडकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.