Thu, Jul 18, 2019 10:36होमपेज › Kolhapur › ...तर मशिदीत नमाज पढायला लागले असते : चंद्रकांत पाटील

...तर मशिदीत नमाज पढायला लागले असते : चंद्रकांत पाटील

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 12:46AMकागल : प्रतिनिधी

छ. शिवाजी महाराजांनी समाजाला ताठ मानेने जगायला शिकविले. ते चारित्र्यवान आणि प्रामाणिकपणे जगले, तसेच जीवन जगण्याची देशाला गरज आहे. शिवराय नसते तर आपल्याला मशिदीमध्ये नमाज पढायला जावे लागले असते. शिवजयंतीसाठी तीन ठिकाणी निमंत्रण असतानाही समरजितसिंह घाटगे साजरी करीत असलेल्या शिवजयंतीला कागलला आलो, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कागल येथील छ. शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ पालकमंत्री   पाटील, मृगेंद्रसिंह घाटगे, प्रवीणसिंह घाटगे यांच्या हस्ते व विशेष निमंत्रित म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शिवजयंतीला मला तीन ठिकाणी निमंत्रण होते. खा. संभाजीराजे  यांनी दिल्‍लीत शिवजयंती साजरी केली. तिथे आणि शिवनेरीवर आमंत्रण होते; पण या दोन्ही ठिकाणी न जाता समरजितसिंह घाटगे साजरी करीत असलेल्या शिवजयंतीला आलो. शिवरायांसारखे जीवन जगण्यात मोठा पुरुषार्थ आहे. तशा प्रकारचे जीवन समरजितसिंह घाटगे जगत आहेत. विरोधकांच्या कोणत्याही टीकेला न घाबरता जनतेसाठी काम करीत आहेत. आलात तर तुमच्या बरोबर, नाही आला तर तुमच्या शिवाय अशी भूमिका घेऊन अठरापगड जातींना एकत्र घेऊन पुढे जात आहेत.

शिवरत्न शेटे म्हणाले, महाराष्ट्रातील अठरापगड जातींना राजा छत्रपती माझा आहे, असे वाटले तिथेच महाराजांचे मोठेपण आहे. शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी अठरापगड जातींची माणसे मराठे म्हणून लढले. आपल्या राष्ट्रगीतामध्ये ही मराठा असा उल्‍लेख आहे.  मराठा  शब्दाची व्याख्या व्यापक आहे. 

समरजितसिंह घाटगे म्हणाले, मला बच्चा म्हणण्याचे धाडस केले जात आहे. ज्ञानेश्‍वरांनी सोळाव्या वर्षीच पसायदान लिहिले. सोळाव्या वर्षीच शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती. तालुक्यात सध्या भांडणे लावली जात आहेत. महिलांचा अपमान केला जात आहे. आता आपल्याला  सुराज्य निर्माण करावयाचे आहे. सर्वांनी एकजूट करून नकारात्मकराजकारण संपवायचे आहे. यापूर्वी कागल शहरात शिवजयंती होऊ नये म्हणून वीज दिली गेली नाही. धमक्याही दिल्या जात होत्या.

समरजितसिंह घाटगे यांना चांदीची तलवार देण्यात आली. स्वागत भैया इंगळे यांनी केले. यावेळी प्रवीणसिंह घाटगे, मृगेंद्रसिह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, उदयबाबा घोरपडे, भूषण पाटील, बाबगोंडा पाटील आदी उपस्थित होते.