Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : पाणी पुरवठा अभियंता लाचलुचपच्या जाळ्यात

कोल्‍हापूर : पाणी पुरवठा अभियंता लाचलुचपच्या जाळ्यात

Published On: May 23 2018 7:23PM | Last Updated: May 23 2018 7:23PMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड पंचायत समिती विभागाकडील कनिष्ठ जलअभियंता चंद्रकांत ज्ञानू लोखंडे (वय 42) यास लाचप्रकरणी बुधवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने चंदगड येेथील राहत्या घरी पकडले.कंत्राटदार शंकर चव्हाण यांनी हेरे येथील गटार बांधकामाचे काम घेतलेले होते. फेब्रुवारी महिन्यात काम पूर्ण झाले होते. मात्र, त्या कामाचा मूल्यांकनाचा दाखला पंचायत समिती चंदगड येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शेंडे तसेच कनिष्ठ अभियंता चंद्रकांत लोखंडे यांनी दिलेला असून, त्या कामाच्या बिलाचे पैसेही चव्हाण यांना पोेपकर यांच्यामार्फत मिळाले आहेत. त्यानंतर गटार सफाई करण्याच्या कामाचा ठेका एकनाथ नाना सुतार यांना ग्रामपंचायत हेरेकडून मिळाला होता. ते काम सुतार यांनी चव्हाण यांना दिले होते. चव्हाण यांनी ते काम पूर्ण करून दिले होते. त्या

कामाचे पैसे सुतार यांना हेरे ग्रामपंचायतीकडून मिळणार होते. लोखंडे व शेंडे यांच्याकडून कामाचे मूल्यांकन करून एम. बी. लिहून घेऊन ग्रामपंचायत हेरे येथे देणे आवश्यक होते. सरपंच व ग्रामसेवक यांनी पंचायत समितीला पत्र दिले होते. सुतार यांच्या वतीने चव्हाण यांनी लोखंडे याची भेट घेतली असता, मूल्यांकन करून घेऊन एम.बी. लिहून देण्यासाठी त्याने सहा हजारांची मागणी केली. चव्हाण यांनी लाचलुचपत विभागाला कळविले. लाचेची मागणी करतानाची ध्वनिफीत लाचलुचपत विभागाकडे दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत विभागाने लोखंडे याच्या राहत्या घरी छापा टाकला व अटक केली. त्यानंतर जबाब घेताना लोखंडे जोरजोरात रडू लागला. काही क्षणानंतर तो बेशुद्ध पडला. चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तो शुद्धीवर आल्यानंतर रात्री उशिरा तपास पूर्ण करण्यात आला.