Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Kolhapur › ‘चंदगड’साठी शिवसेनेचा चेहरा ठरेना

‘चंदगड’साठी शिवसेनेचा चेहरा ठरेना

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 07 2018 11:06PMगडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचे वर्चस्व असले, तरी या मतदारसंघामध्ये गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेने आंदोलने वेगाने सुरू करून, अनेक आंदोलने मार्गस्थ लावण्याचे काम केले आहे. शिवसेनेकडून संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे व प्रभाकर खांडेकर हे निवडणुकीसाठी इच्छुक असून, त्यांनी त्यादृष्टीने काम सुरू केले आहे. मात्र, कोणाला उमेदवारी मिळणार, याची निश्‍चिती नसल्याने वेग मंदावला आहे. साहजिकच, याचा तोटा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. 

चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये मागीलवेळी राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवडणूक जिंकली. या निवडण्ाुकीमध्ये मात्र त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर व अप्पी पाटील यांनी त्यांना विजयासाठी झुंजवले. शिवसेनेकडून संग्रामसिंह कुपेकर व प्रा. सुनील शिंत्रे हे मुख्य दावेदार असून, प्रभाकर खांडेकर यांनीही फिल्डिंग लावली आहे. काही महिन्यांपूर्वी शेतकरी संवादाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघाच्या दौर्‍यावर आले. मात्र, त्यांनी या तिघांकडेही भेटी देऊन तिन्ही दरडींवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. याच दौर्‍यामध्ये ठाकरे यांनी एकाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून अन्य दोघांचे इतरत्र पुनर्वसन केले असते, तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या असलेल्या चित्रापेक्षा सेनेचे चित्र फारच वेगळे दिसले असते. 

आजच्या घडीला संग्रामसिंह कुपेकर व प्रा. सुनील शिंत्रे हे उमेदवारी आपल्यालाच मिळणार, या अपेक्षेने काम करत असले, तरी याबाबतची खात्री नसल्याने जितका वेग अपेक्षित आहे तितक्या वेगाने या दोघांचेही काम होताना दिसत नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांपैकी एकाच्या खांद्यावर उमेदवारीची धुरा दिल्यास तो आजपासूनच या मतदारसंघातील सर्वच प्रकारचे नियोजन लावू शकतो. मात्र, सेनेला यामध्ये दुसरा दुखावण्याची भीतीच अधिक असल्याने असे होताना दिसत नाही. एकीकडे, आज यापैकी एक दुखावण्याची भीती असली, तरी ऐनवेळी उमेदवारी दिल्यानंतर यापैकी एकजण नक्कीच नाराज होणार असून, त्यावेळेची नाराजी सेनेला परवडणारी नाही. यामुळे याचे नियोजन होणे आवश्यक आहे.