Mon, Aug 26, 2019 10:47होमपेज › Kolhapur › मानवी आरोग्यापुढे अर्धशिशीचे आव्हान! 

मानवी आरोग्यापुढे अर्धशिशीचे आव्हान! 

Published On: Jul 24 2019 1:39AM | Last Updated: Jul 24 2019 1:39AM
कोल्हापूर : राजेंद्र जोशी

बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, सकस आहाराचा आणि नियमित व्यायामाचा अभाव यामुळे कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आणि किडनीच्या विकारांनी मानवी आरोग्यापुढे गंभीर आव्हान उभे केले आहे. आता हीच कारणे जगभरात अर्धशिशी (मायग्रेन)च्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ घालत असल्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्‍त केली आहे. प्राथमिक स्तरावर दुर्लक्ष केले तर हा  रोग अधिक बळावण्याचा धोका असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. जुलै महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात जागतिक मायग्रेन सप्‍ताह पाळला जातो. त्यानिमित्ताने संघटनेकडून प्रकाशित केलेल्या अहवालात मायग्रेनच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. 

भारतातही वर्ल्ड फेडरेशन ऑफन्यूरॉलॉजी आणि इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफन्यूरॉलॉजीच्या सूचनेवरून मायग्रेन सप्‍ताह पाळण्यात येतो. जगभरात सुमारे 17 कोटी व्यक्‍तींना मायग्रेनचा त्रास असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराला मेंदूतील काही रासायनिक स्थित्यंतरे कारणीभूत ठरतात. महिलांमध्ये संप्रेरकांचे बदल झपाट्याने होत असतात. त्यामुळे महिलांत याचे प्रमाण अधिक असते.