Tue, Jul 23, 2019 06:45होमपेज › Kolhapur › 1.65 लाखाचा चक्‍का, 65 हजारांचा खवा जप्‍त

1.65 लाखाचा चक्‍का, 65 हजारांचा खवा जप्‍त

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:23AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी आणि आलास येथील दोन ठिकाणी छापा टाकून जिल्हा अन्‍न व औषध प्रशासनाने संशयास्पद भेसळीचा 1 लाख 65 हजार रुपयांचा चक्‍का आणि 65 हजार रुपयांचा खवा जप्‍त केला. जिल्ह्यात खाद्यपदार्थांमधील भेसळीबाबत तपासणी आणि कारवाईची मोहीम यापुढेही अशाच प्रकारे सातत्याने चालू राहणार असल्याचे जिल्हा अन्‍न व औषध विभागाचे सहायक आयुक्‍त एस. ए. चौगुले यांनी स्पष्ट केले आहे.

दै. ‘पुढारी’ने खाद्यपदार्थांमधील भेसळीबाबत ‘भेसळीचा भस्मासुर’ ही वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेऊन अन्‍न व औषध प्रशासनाने जिल्हाभर खाद्यपदार्थांमधील भेसळीबाबत तपासणी सुरू केली आहे. या तपासणीदरम्यान गणेशवाडी येथील एक व्यावसायिक नियमबाह्यपणे चक्‍का तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी छापा टाकून तपासणी केली असता जवळपास 1.65 लाख रुपयांचा संशयास्पद चक्‍का आढळून आला, तो जप्‍त करण्यात आला आहे. या चक्क्यात भेसळ असल्याचा संशय असून, त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

आलास गावात नियमबाह्यपणे खवा तयार होत असल्याचे निदर्शनास आले होते. अन्‍न व औषध विभागाने या ठिकाणी छापा टाकून जवळपास 65 हजार रुपयांचा भेसळीचा संशय असलेला खवा जप्‍त केला. त्याचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय अकिवाट येथील एका दूध केंद्रातील दुधाबाबत संशय आल्याने त्याचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या कारवाईत उपायुक्‍त चौगुले यांच्यासह अन्‍न निरीक्षक अधिकारी कोळी, श्रीमती टोणपे आदींनी सहभाग घेतला.