Fri, Mar 22, 2019 01:50
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › चार्‍याचा दर झाला दीडपट

चार्‍याचा दर झाला दीडपट

Published On: Mar 01 2018 1:39AM | Last Updated: Mar 01 2018 12:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने जनावरांसाठीचे उसाचे वाडे मिळणे आता कठीण होत आहे. परिणामी हिरव्या वैरणीचा प्रश्‍न गंभीर बनत असून पिंजर, हिरवा मका, ज्वारी कडबा या वैरणीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून वैरणीच्या कमतरतेमुळे दुभत्या जनावरांवर परिणाम जाणवत आहे. दूध उत्पादनही घटत आहे. दूध उत्पादकांना हिरव्या वैरणीसाठी दीडपटने पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

जनावरांना हिरव्या वैरणीसाठी ऊस पीक मोठा आधार बनला आहे. नोव्हेंबर ते मार्च या चार महिन्यांत उसाचे वाडे उपलब्ध होते. वैरणीची कमतरता जाणवत नाही. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आल्याने मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात मक्का, ज्वारी व पिंजर या वैरणीची किंमती वाढल्या असून ज्वारी कडबा जनावरांच्या आरोग्यासाठी व दूध वाढीसाठी पोषक असल्याने कडबा शेकडा पेंढीसाठी आठशे ते हजार रुपये मोजावे लागत आहेत,  तर ओल्या मक्याच्या वैरणीचा दर देखील वाढला आहे. पिंजराच्या एका ट्रॉलीसाठी पाच ते सहा हजार मोजावे लागत आहे. लागण व खोडव्याच्या ऊस पिकास पुरेसा पाला सुटेपर्यंत हा तुटवडा तीव्रतेने जाणवणार आहे.

काही शेतकर्‍यांनी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन वेळीच सावध होत ऊस लागण, खोडवा पिकांमध्ये तसेच रिकाम्या रानात देखील मका, कडवळ याद्वारे चार्‍याची निर्मिती केली आहे, तर काही शेतकर्‍यांनी स्वत:च्या चार्‍याचा प्रश्‍न मिटवतानाच व्यावसायिक दृष्टिकोनातूनही चारा लागवड केली असून त्याची विक्री गुंठ्यावर केली जात आहे. मक्याच्या प्रतिगुंठ्यास दर 1200 ते 1500 रुपये असा आहे, तर चार्‍यासाठी ज्वारीदेखील केली असून त्याचा दरही मक्याच्या दरापेक्षा अधिक आहे.